सामाजिक

अनाथांची माय हरपली! ज्येष्ठ समाजसेविका व अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांचे हृदय विकाराने निधन झाले

अनाथांच्या माई सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात उपचारा दरम्यान निधन

लोकपत्र न्यूज

संपादक-दिनेश खंडेलवाल

पुणे : अनाथांच्या कार्यासाठी स्वतःला झोकून देणारे व संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असलेली व्यक्ती म्हणजेच अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांंचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी त्या ७३ वर्षांच्या होत्या. रात्री ८ वाजून १० मिनिटांनी त्यांचे निधन झाले. पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

महिना भरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना २०१२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला होता तर २०२१ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात त्यांनी संस्था सुरु केली होती.

सिंधुताई सपकाळ यांचा अल्पपरिचय——

महिलांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम त्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याच्या आरंभीस केले.
जन्म. १४ नोव्हेंबर १९४८ रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील पिंपरी मेघे येथे.
आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणा-या व्यक्तीमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव अग्रक्रमाने आणि आदराने घेतले जात असे. सिंधुताईनां लोक प्रेमाने माई म्हणत असत.
माई मुळच्या विदर्भातल्या, त्यांचे वडील अभिमान साठे गुरे वाळण्याचं काम करायचे. नवरगाव हे अतिशय मागासलेले शहरी सुविधाचा स्पर्श नसलेले. कुणालाही शिक्षणाचा गंध नाही अशा परिस्थितीत अभिमान साठे पिंपरी गावात आले. चिंधी म्हणजेच सिंधुताई ही त्यांची सर्वात मोठी मुलगी. सिंधुताईंना एक भाऊ आणि एक बहिण आहे. मुलीनं शिकावे अशी त्यांच्या वडिलांची खूप इच्छा होती पण आईचा मात्र सक्त विरोध होता म्हणुन माईंना गुर राखायला पाठवत असे. इकडे माई शाळेत जाऊन बसत. माई मुळच्या बुद्धिमान पण जेमतेम मराठीच शिकता आले. अल्पवयात लग्न झाले. चिंधा साठे ची चिंधाबाई श्रीहरी सपकाळ झाली. लग्नाच्या वेळी माईचे वय होते अकरा वर्ष आणि नव-याचे वय तीस वर्ष. घरी प्रचंड सासुरवास आणि ढोर मेहनत करावी लागत असे. अठराव्या वर्षापर्यंत माईची तीन बाळंतपण झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या जीवनातील पहिला संघर्ष केला. तेव्हा गुर वळणे हा त्यांचा व्यवसाय होता. गुर ही शेकड्याने असायची त्यांचे शेण काढता काढता कंबर मोडायचे. स्त्रिया शेण काढून अर्धमेल्या होऊन जात. पण त्या बद्दल त्यांना कोणतीही मजुरी मिळायची नाही म्हणून माईंनी बंड पुकारले. माई हा लढा जिंकल्या पण या लढ्याची किमत त्यांना चुकवावी लागली. बाईच्या या धैर्यामूळे गावातील जमीनदार दमडाजी असतकर दुखावला गेला. कारण जंगल खात्यातून येणारी मिळकत बंद झाली आणि गावक-यांना माईचे नवीन नेतृत्व मिळाले. याचा काटा काढण्यासाठी माईच्या पोटातील मूल आपल असल्याच खोटा प्रचार दमडाजीने सुरु केला. यामुळे श्रीहरी सपकाळ यांच्या मनात माईच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला. त्यांनी माईना बेदम मारहाण केली आणि घराबाहेर काढले व त्यांना गोठ्यात आणून टाकले. त्या अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली. पतीने हकल्यानंतर गावक-यांनीही त्यांना हाकलून दिले. माराने अर्धमेल्या झालेल्या माई माहेरी आल्या पण सख्या आईनेही पाठ फिरवली. पोट भरण्यसाठी भिक मागण्याची वेळ माईवर आली.

परभणी-नांदेड-मनमाड स्टेशनवर त्या भीक मागत असत व स्टेशनवरच झोपत असत. स्टेशनवरच्या उघड्यावर राहणे शक्य नसल्याने माईंनी स्मशान गाठले. त्या स्मशानात राहू लागल्या. पण पोटातल्या भुकेचा काय? एक मृत देह आला. अंत्यसंस्कार झाले. अंत्यविधी करून लोक निघाले. एखादा पैसा हातावर पडेल म्हणून माई त्यांच्या मागे चालू लागल्या एकाला त्यांची दया आली. त्याने त्यांना थोडे पीठ आणि पैसे दिले. माईंनी मडक्यात पीठ कालवले, चितेवरच्या निखा-यावर भाजले आणि कडक भाकरी केली व तशीच खाल्ली.

एकदा पुण्यात रस्त्यावर माईना एक मुलगा रडत बसलेला दिसला त्याचे नाव दीपक गायकवाड एवढेच सांगता येत होते. माई मुलाला घेऊन पोलीस स्टेशनला गेल्या व त्यांनी तक्रार नोंदवून घेतली नाही आणि हुसकून लावले. माईंनी मात्र मुलाला सांभाळण्याचे ठरवले पुढे महिन्याभरात अशीच भीक मागणारी २-३ मुले त्यांना भेटली. त्यानांही आपल्या पदराखाली घेतले. निराश्रीतांचे जगणे किती भयंकर असते ते त्यांनी अनुभवले होते. ते या मुलांच्या वाट्याला येऊ नये ही त्यांची इच्छा होती.
निराश्रीतांच्या कल्याणसाठी माईंनी त्यांच्या मुलीला ममताला दगडूशेट हलवाई मंदिर समिती सदस्य तात्यासाहेब गोडसे यांच्याकडे मुलीला सांभाळण्यास दिले आणि ममता पुण्याच्या सेवासदन मध्ये दाखल झाली. माई ममताला सहज सांभाळू शकत होत्या. पण एखाद्या दिवशी मुलांना उपाशी राहण्याची वेळ आली असती तर माईंनी काय केल असते? ज्या मुलांना माई सांभाळणार होते ती मुलं पाणी पिऊन झोपली असती पण ममताला पाहून माईची माया जागृत झाली असती आणि तिला गुपचूप दोन घास खाऊ घातले असते. पण माईंना हा अन्याय करायचा नव्हता म्हणून माईंनी मुलीला दगडूशेट गणपतीच्या पायाशी घातले.

महाराष्ट्र-मध्य प्रदेशाच्या सीमेवर मेळघाट व्याघ्र प्रकल्पसाठी स्थान निश्चिती होत होती. या प्रकल्पासाठी जंगलातील ८४ गावातील आदिवासी निर्वासित होणार होते. त्यांच्या पुनर्वसनसाठी शासनाकडे कोणतीही योजना नव्हती. माईंनी या आदिवाशी लोकांची बाजू शासनासमोर मांडून त्यांना न्याय मिळवून दिला. माई अजून एक लढाई जिंकल्या. अशा अनेक लढाया माई रोज लढतच असतात.
आज महाराष्ट्रात माईंचे चार अनाथआश्रम आहेत काही वर्षांपूर्वी माईंनी चिखल द-यात वसतीगृह सुरु केले. आज ब-याच मुली या ठिकाणी राहून शिक्षण घेत आहे. दोन दिवसाच्या मुलापासून ७२ वर्षाच्या वृध्दापर्यंत सगळीच त्यांची मुले आहे. लेकीच्या मुलींचे आडनाव साठे तर मुलांचा नाव सपकाळ असते. बरीचशी मुले शिकून स्वतःच्या पायावर उभी आहेत. माझी मुले डॉक्टर, वकील, शिक्षक आहेत. हे सांगताना त्यांचा चेहरा फुलून येतो. ममताने ही एम.एस.डब्लू. केले आहे. ती आता माईचे काम पाहते. २०१६ मध्ये सिंधुताईच्या कार्यासाठी समाजसेवेकरिता त्यांना डि वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मार्फत डॉक्टरेट प्रदान करण्यात आले. माईंच्या ह्याच धैर्यवान आणि त्याकामात झोकून दिलेल्या व्यक्ती तत्वामुळे त्यांना ५०० पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले होते. सिंधुताई सपकाळ यांना डॉक्टरेटची उपाधीही मिळालेली आहे. तसेच सिंधुताई सपकाळ यांना नुकतंच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होते.

बातमी व जाहिरात साठी संपर्क-               दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close