विठ्ठल कारखाना चालू व्हावा हीच श्रीपांडूरंगाची इच्छा आणि त्यासाठीच माझी उमेदवारी – अभिजीत पाटील
अभिजीत पाटलांची उमेदवारी कायम सभासद शेतकऱ्यांच्या प्रार्थनेला आले यश
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शेवटच्या दिवशी उमेदवारी दाखल केलेले अभिजीत पाटील यांच्या अर्जाला हरकत घेण्यात आली होती त्याच बरोबर अनेक दिग्गज उमेदवारांच्या अर्जाला ही हरकत घेतली गेली परंतु आपण या निवडणुकीत उभा करून निवडणूक लढवणारच यावर ठाम असलेले अभिजीत पाटील यांना अखेर सभासदांच्या पाठबळामुळे विठ्ठल पावला आणि आज त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आल्याने एकच जल्लोष दिसून आला
विठ्ठल कारखाना चालू व्हावा हीच पांडुरंगाची इच्छा असल्याने माझी उमेदवारी मान्य झाली अशी प्रतिक्रिया विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे तगडे उमेदवार अभिजीत पाटील यांनी व्यक्त केली.
श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्यापासून संपूर्ण पंढरपूर तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दहा पंधरा वर्षात सत्ताधारी गटाला सोपी वाटणारी ही निवडणूक चालू वर्षी मात्र सत्ताधारी गटासाठी कठीण होऊन बसली आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे पंढरपूर तालुक्यात चर्चेत असलेले अभिजीत आबा पाटील यांनी विठ्ठल परिवर्तन विकास पॅनल उभा करून सत्ताधारी गटाला दिलेले कडवे आव्हान होय. अगोदरच गेल्या तीन हंगामात दोनवेळा कारखाना बंद राहिल्याने तसेच शेतकरी व कामगारांची देणी थकल्याने सत्ताधारी गट अडचणीत आला असताना अभिजीत पाटील यांच्या सभांनी त्यांची झोप उडवली आहे.
विठ्ठलच्या निवडणूकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची शुक्रवारी छाननी करण्यात आली.यावेळी अनेक माजी संचालकांचे अर्ज अवैध ठरल्यानंतर अभिजीत पाटील, बी.पी.रोंगे, समाधान काळे, गणेश पाटील, यासह अनेक प्रमुख नेत्यांच्या हरकतींवरील निकाल राखून ठेवण्यात आला होता. यामध्ये प्रामुख्याने युवराज पाटील गटाचे गणेश पाटील, प्रा.बी.पी.रोंगे सर,कल्याणराव काळे यांचे बंधू समाधान काळे तसेच प्रमुख विरोधी पॅनेलचे प्रमुख अभिजीत पाटील यांचा समावेश होता. अभिजीत पाटील यांच्या हरकतीवर ॲड.दत्तात्रय घोडके, ॲड. सिद्धेश्वर चव्हाण व ॲड.सजंय रोंगे हे वकील उभे होते. यावेळी अभिजीत पाटील यांच्या अर्जावर हरकती प्राप्त झाल्यानंतर अनेक सभासद शेतकऱ्यांनी देव पाण्यात ठेवले होते. तर कित्येक सभासद शेतकऱ्यांनी विठ्ठलाला अभिषेक घालून साकडे घातले होते. तसेच रोपळे येथील सभासदांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत १५ किमी अंतरावर असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरापर्यंत पायी वारी करत विठ्ठलाला साकडे घातले होते. यावर सोमवारी निकाल आला असून अनेकांना या निकालाने धक्का बसला आहे तर दुसरीकडे अभिजीत पाटील यांचा अर्ज वैध ठरला. कार्यकर्ते सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण झाले असून विठ्ठल मंदिराजवळ पेढे वाटून व फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.
हरकती असलेल्या अनेकांचे अर्ज अवैध ठरले आहेत यातील युवराज पाटील गटाचे गणेश पाटील,प्रा.बी. पी.रोंगे सर ,समाधान काळे यांचे अर्ज अवैध ठरले आहेत. तर प्रमुख विरोधक असलेल्या अभिजीत पाटील यांचा अर्ज वैध ठरला असून तालुक्यात आज वेगळीच रंगत पाहता आली.
[सहकार्यांनी व माझ्या मायमाऊलीनी देव पाण्यात ठेवून प्रार्थना केली तर काही सहकार्यांनी विठ्ठलाला अभिषेक घालता.
“गोरगरीब शेतकऱ्यांसाठी विठ्ठल कारखाना हा चालू झाला पाहिजे व शेतकरी, कामगारांना न्याय मिळाला पाहिजे हीच श्रीविठ्ठलाची इच्छा असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. त्यामुळेच विठ्ठलाच्या आशिर्वादाने आपली उमेदवारी कायम राहिली असून सर्व सभासद शेतकऱ्यांसाठी ही लढाई जिंकणार असल्याचे अभिजीत पाटील त्यांनी सांगितले.]