संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : चिंचणी येथील रहिवास्यांचा लोकसहभाग, लोकवर्गणी व शासनाचा निधी या त्रिवेणी माध्यमातून सार्वजनिक मालकी असणारे राज्यातील पहिले ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र उभे केलेले आहे. सदर केंद्राचे उद्घाटन माजी मंत्री सुभाष (बापू )देशमुख आ. बबन(दादा) शिंदे मा. आ. प्रशांतराव परिचारक चेअरमन कल्याणराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी बोलताना आ. सुभाष (बापू) देशमुख म्हणाले की चिंचणीकरांनी समृद्ध विकासाचा एक नवा पायंडा पाडला आहे. गावाच्या सर्वांगीण विकासाबरोबर गावातील लोकांना पर्यटनाच्या माध्यमातून गावातच रोजगार उपलब्ध होण्यासाठी पर्यटन केंद्राची उभारणी केली आहे. या पर्यटन केंद्रामध्ये शहरी भागातील त्याच बरोबर ग्रामीण भागातील लोकांनी येऊन ग्रामीण जीवनशैलीचा इथल्या खाद्यपदार्थांचा आनंद घेता येणार आहे.
यावेळी आ.बबनदादा शिंदे म्हणाले की चिंचणी गावाला शासनाकडून पर्यटनाचा क वर्ग दर्जा देण्यात आलेला आहे. जिल्हा वार्षिक योजने मधून चिंचणी येथे नाना- नानी पार्क तसेच इतर सुविधांसाठी या वर्षाकरिता 70 लाख रुपये मंजूर केले आहेत. तसेच 2515 योजनेमधून सुशोभीकरणासाठी दहा लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय इतर वेगवेगळ्या योजनांमधून चिंचणी गावाला कृषी आणि ग्रामीण पर्यटनाचे केंद्र उभे करण्यासाठी व हे गाव स्वयंपूर्ण साठी आमदार म्हणून विशेष प्रयत्न असून त्यासाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी मा .आ .प्रशांतराव परिचारक यांनी बोलताना सांगितले की चिंचणीकरांनी ग्रामीण कृषी पर्यटन उभे करून तालुक्यातील गावांना नवी दिशा देण्याचे काम केले आहे सध्या पर्यटन क्षेत्रामध्ये संधी असून पर्यटन हे एकमेव क्षेत्र कोरोना च्या काळात सुद्धा टिकून राहिले आणि यामुळे देशाचा विकास दर कायम राहणे व वाढ होण्यामध्ये मदत झाली त्यामुळे चिंचणीकर यांनी सुरू केलेलं काम हे भविष्यात देशामध्ये दिशादर्शक राहिल. यावेळी बोलताना कल्याणराव काळे म्हणाले की गावाच्या एकजूटी मुळे हे कार्य उभे राहिले आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन अनपट यांनी केले तर सूत्रसंचालन समाधान काळे सर यांनी केले आभार चंद्रकांत पवार व स्वागत शशिकांत सावंत यांनी केली यावेळी पंढरपूर शहर ग्रामीण तसेच वेगवेगळ्या भागातून जवळजवळ दीडशे पर्यटक आले होते.
पहिल्याच दिवशी नागरिकांचा प्रतिसाद
पहिल्या कृषी पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांना, पर्यटकांसाठी प्रत्येकी तीनशे रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली होती. दरम्यान कार्यक्रमांसाठी उपस्थित असणाऱ्या दीडशे लोकांनी या ठिकाणी प्रवेश फी नोंदवून या पर्यटनाचा व जेवणाचा आस्वाद घेतला. पहिल्याच दिवशी चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्राला मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळाला.