२०१० पर्यंत सगळं ठीक होतं;पण दोन दादा आले आणि श्री विठ्ठल कारखाना अडचणीत सापडला!
कौठाळी व व्होळे येथे अभिजीत पाटील यांना शेतकरी सभासदांचा मोठा प्रतिसाद
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : पंढरपूर तालुक्याची अर्थदायीनी असलेल्या श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीबाबत सध्या तालुक्यात रणधुमाळी सुरू आहे. अशातच श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी पॅनलचे प्रमुख अभिजीत पाटील यांना शेतकऱ्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. २०१० पर्यंत विठ्ठल सहकारी कारखाना चांगला चालू होता. कारखान्याला उत्कृष्ट नियोजनाचा पुरस्कारही मिळाला होता पण २०१० साली कारखान्याच्या संचालक मंडळावर दोन दादा आले आणि कारखाना अडचणीत सापडत गेला. ज्यावेळी आपल्या पगारासाठी लढणाऱ्या कामगारांवर गुन्हे दाखल झाले त्यावेळी हे दोन दादा काय करत होते. आता निवडणूक आल्यावर वारसा सांगणारे सत्ताधारी नेते त्यावेळी कुठे गायब होते? असा घणाघात श्री विठ्ठल परिवर्तन विकास पॅनलचे प्रमुख अभिजीत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर टिका केला आहे. ते
कारखाना निवडणूकीसाठी विठ्ठल परिवर्तन विकास पॅनेलच्या वतीने व्होळे व कौठळी येथील बैठकीत बोलत होते.
काही लोकं खोटं बोलून शेतकऱ्यांची उसाच्या काट्यात फसवणूक करतात पण मी ज्या काट्यावर ऊसाचे वजन घेईन त्याच काट्यावर साखरेचे वजन केले जाईल. सभासदांनी त्यांचा ऊस कोणत्याही काट्यावर वजन करून गाळपास आणावा असे ते म्हणाले. तसेच साखरेला चांगला दर मिळावा असे वाटत असेल तर जागतिक बाजारपेठेची माहिती करून घ्यावी लागेल. तरच साखरेला चांगला दर मिळेल तसेच भविष्यात इथेनॉल निर्मितीवर भर देण्यात येणार असून यामुळे ऊस उत्पादकांना चांगले दिवस येतील असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.” निवडणूकीच्या तोंडावर आता वेगळी चूल मांडून काहीजण शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. आतापर्यंत सत्तेसाठी १२ वर्षे मांडीला मांडी लावून बसले मात्र निवडणूक जाहीर झाल्यावर वारसदार नातवाला विठ्ठलमध्ये भ्रष्टाचार होतो हा साक्षात्कार झाला. जर काळाबाजार झाला असेल तर सत्ताधारी दोन्ही गट यासाठी जबाबदार आहेत.
एकीकडे शेतकरी सभासद व कामगारांना लुटून आता मात्र आता मतासाठी गावोगावी फिरणाऱ्या सत्ताधारी गटाने किती शेतकशेतकऱ्यांना मदत केली ते सांगावे असा आरोप त्यांनी दोन्ही सत्ताधारी गटांवर केला.
बिल मागताना त्या वेळी तुम्ही नॉट रीचेबल होता आणि आता मते मागताना आपल्या वडील आणि आजोबांचा वारसा सांगत फिरता हा अधिकार तुम्हाला कुणी दिला? असा घणाघाती आरोप शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांनी केला.
आमची युती ही शेतकरी, कामगार यांचा सर्वागीण विकास व्हावा यावर झालेली आहे. कारखाना बंद पाडणाऱ्याकडे नाही तर कारखाना सुरू करणाऱ्याच्यासोबत संघटनेने युती केली आहे. सभासदांनी अभिजीत पाटील यांच्या कार्यावर विश्वास ठेऊन मतदान रूपी पॅनलला आशीर्वाद द्यावा असे शेतकरी संघटनेचे रणजीत बागल म्हणाले.
यावेळी पंचायत समितीचे मा.सभापती विष्णु बागल,पंढरपूर माजी नगराध्यक्ष सुभाष दादा भोसले, चंद्रभागा सह.साखर कारखान्याचे संचालक दिनकर चव्हाण, विठ्ठल सह.साखर कारखान्याचे मा.संचालक राजाराम सावंत, तालुका अध्यक्ष सचिन पाटील, कौठळीचे मोहन पाटील, विठ्ठल पाटील, बाळासाहेब धुमाळ, शिवाजी नागटिळक, संदीप पाटील, अनिलनाना नागटिळक, नामदेव लेंडवे, गजानन मेडीकल श्रीरंग बागल, विजय रणदिवे, व्होळे गावचे अनिल होळकर, योगेश होळकर, विठ्ठल खळगे, अनिल लाडे, आबा कोळेकर, मधूआबा नाईकनवरे, सिद्धेश्वर बंडगर, वाडीकुरोली सरपंच धनंजय काळे, विठ्ठल रणदिवे, ॲड.नितीन खटके, दत्ता नागणे, दत्ताभाऊ व्यवहारे, दशरथ जाधव, प्रा.मस्के सर, तळेकर सर, जिल्हाध्यक्ष ॲड.विजयकुमार नागटीळक, युवा जिल्हा कार्याध्यक्ष मनोज गावंधरे, साहेबराव नागणे, सचिन आटकळे, रणजीत बागल, नाना चव्हाण, सोमनाथ घोगरे, नंदकुमार बागल, यांसह पंचक्रोशीतील शेतकरी सभासद उपस्थित होते.