ईतर

देगाव ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार दाखवा;एक लाख रोख मिळवा

सोलापूर जिल्ह्यातील पहिली भ्रष्टाचार विरहित ग्रामपंचायत जिने केले आवाहन

संपादक-दिनेश खंडेलवाल

देगाव ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार दाखवा;एक लाख रोख मिळवा

सोलापूर जिल्ह्यातील पहिली भ्रष्टाचार विरहित ग्रामपंचायत जिने केले आवाहन

पंढरपूर : महाराष्ट्र राज्यातील कोणतेही ग्रामपंचायत ही लोकांच्या विकासासाठी काम करणारी संस्था असते. पारदर्शक व भ्रष्टाचार मुक्त ग्रामपंचायत म्हणून पंढरपूर तालुक्यातील देगाव ग्रामपंचायत कार्य करीत आहे. त्याचबरोबर या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उपक्रमशील विकास कामेही होताना दिसतात या ग्रामपंचायतीच्या कार्यात कुठेही अनियमित्ता अगर भ्रष्टाचार असल्याचे दाखविल्यास अशा व्यक्तींना ग्रामपंचायतीच्या वतीने एक लाख रुपयाचे रोख बक्षीस देण्याचा निर्णय या ग्रामपंचायतीने घेऊन सोलापूर जिल्ह्यातील पहिली भ्रष्टाचार मुक्त ग्रामपंचायत कारभार सुरू असल्याचे दाखवून दिले आहे.

पंढरपूर तालुक्यातील उपक्रमशील ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या देगाव ग्रामपंचायतीने आणखी एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या कामकाजामध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता आढळल्यास अगर भ्रष्टाचार आढळल्यास रोख एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार असल्याचे या ग्रामपंचायतीने जाहीर करून आपली ग्रामपंचायत ही स्वच्छ कारभार करणारी आहे हे स्पष्टपणे दाखवून दिले आहे.

पंढरपूर तालुक्यातील देगाव ग्रामपंचायत कोरोना काळात राबवलेल्या यशस्वी उपाययोजनांमुळे व प्रभावी लसिकरणामुळे चर्चेत आली होती. सोबतच या ग्रामपंचायतीने गेल्या महिन्यापूर्वी दोन तास अभ्यासासाठी हा उपक्रम सुरू केला होता. जो संपूर्ण राज्यभर गाजला. दरम्यान जिल्हा परिषद शाळेत सर्व वर्गांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसवणारी ही राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे. या उपक्रमाची यशस्वी वाटचाल सध्या सुरू असून यातच कोट्यावधीची विकासकामेही या ग्रामपंचायतीच्या मार्फत सुरू आहेत. या ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ सीमा संजय घाडगे यांच्या नेतृत्वाखाली ही ग्रामपंचायत यशस्वीपणे विकासाची वाटचाल करत असून भ्रष्टाचार मुक्तीकडे व स्वच्छ कारभाराकडे या ग्रामपंचायतीने वाटचाल सुरू केलेली आहे. थेट भ्रष्टाचार दाखवण्याचे आवाहन करून रोख स्वरूपात एक लाखाचे बक्षीस देण्याची घोषणा करणारी राज्यातील ही पहिलीच ग्रामपंचायत ठरली असून या ग्रामपंचायतीने आजपर्यंत गेल्या दोन वर्षात अनेक कौतुकास्पद व मोठे उपक्रम राबवून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

गावातील प्रत्येक नागरिकाने आपल्या ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालतो याची माहिती घ्यावी, त्याचबरोबर ग्रामपंचायतीचा कारभार योग्यरीत्या चालू आहे की नाही, कोणत्या योजना कशा प्रकारे राबवल्या जात आहेत, कशाप्रकारे राबवल्या जाव्यात याबाबत मार्गदर्शन व माहिती या निमित्ताने लोकांकडून घेतली जावी यासाठी हा उपक्रम राबवला जात असल्याचे मत ग्राम पंचायतीने व्यक्त केले आहे. प्रत्येक नागरिक जर ग्रामपंचायतीत सगळी माहिती घेऊ लागला तर भ्रष्टाचार कमी होऊन गावच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले.

[लोक कल्याणासाठी निर्णय———-              “ग्रामपंचायत ही गावच्या विकासासाठी काम करणारी संस्था असून ती चांगल्या लोकांच्या हाती असणे आवश्यक आहे. सोबतच या संस्थेत लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असायला हवा. तसेच चांगल्या कामासाठी सहकार्य व चुकीच्या कामासाठी विरोध करायला हवा. ज्यामुळे लोक सहभाग वाढून भ्रष्टाचार कमी होईल व कामे अधिक चांगली व वेगाने होतील”

सौ.सीमा संजय घाडगे
सरपंच ग्रामंचायत देगाव]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close