पंढरपूर तालुक्यात वाळू माफीयांची गुंडगिरी;तहसीलदारच्या गाडीवर हल्ला,काचा फोडल्या
अंगावर तलवार कोयते कुह्राडी घेऊन आले, दगडफेक केली, जेसीबी व वाहनेही घेऊन गेली
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर तालुक्यात वाळू माफीयांची गुंडगिरी; तहसीलदारच्या गाडीवर हल्ला,काचा फोडल्या
अंगावर तलवार कोयते कुह्राडी घेऊन आले, दगडफेक केली, जेसीबी व वाहनेही घेऊन गेली
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैद्य वाळू उपसा आणि वाहतूक होत आहे. अशा अवैध वाळू उपशावर आळा बसावा यासाठी पंढरपूरचे नूतन तहसीलदार सचिन लंगुटे यांनी भिमानदी काठावरील विविध ठिकाणांवर धाड टाकत कारवाई करण्यास सुरुवात केली. दरम्यान आज पहाटे महसूल चे पथक अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गुरसाळे बंधाऱ्यां नजीक पोहोचले असता त्या ठिकाणी तहसीलदाराच्या वाहनावर दगडफेक करून हल्ला करण्यात आला यावेळी तीस ते चाळीस जणांच्या जमावाने हातामध्ये शस्त्रे घेऊन हल्ला केल्याची घटना घडली आहे.
या घटनेची समजलेली अधिक माहिती अशी
पंढरपूर तालुक्यात विविध ठिकाणी महसूलच्या पथकांमार्फत कारवाई करण्यात येऊ लागली असतानाच आज पहाटे गुरसाळा बंधार्या नजीक कारवाईसाठी महसूल पथक पोहोचले असता त्या ठिकाणी एक जेसीबी, चार टिपर व दोन ट्रॅक्टर आणि काही इसम अवैध वाळू उपसा करताना दिसून आले.
महसूल पथक कारवाईसाठी पुढे जाताच त्यांना पाहून वाळू माफियांनी तेथून पळ काढला व दहा पंधरा मिनिटांमध्ये पुन्हा आपल्या सोबत तीस ते चाळीस जणांचा जमाव घेऊन घटनास्थळी आले अनेकांच्या हातात तलवार, कोयते, कुह्राडी, दगड घेऊन सदर जमावाने हल्ला केला. या मध्ये महसूल पथकाचे वाहनातील तहसीलदारांची गाडी क्रमांक एम एच १३/ डी टी १९१३ ची मागील काच फोडण्यात आली.
या प्रकाराने भयभीत झालेले महसूल पथक आपला जीव वाचवण्यासाठी काही अंतरावर पळून गेले व लपले असता महसूल पथक पळून गेलेले पाहताच वाळू माफियांच्या जमावाने आपापली वाहने घेऊन पळ काढला. परंतु एक टिपर सुरू न झाल्याने त्याच ठिकाणी सोडून गेले. घडलेल्या घटनेची माहिती पथकातील प्रमुखांनी तहसीलदार सचिन लंगुटे यांना कळवली.
दरम्यान घटनेच्या थोड्याच वेळात तहसीलदार सचिन लंगुटे,अप्पर तहसीलदार तुषार शिंदे, तालुका पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर, महसूलचे खर्डी मंडळ अधिकारी दिलीप सरवदे, बोहाळीचे तलाठी विष्णू व्यवहारे ,अमर पाटील तलाठी सोनके, सुधाकर हिल्लाळ कोतवाल तावशी, सुधाकर चंदनशिवे कोतवाल खर्डी हे पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. यावेळी वाळू माफियांनी सोडून गेलेला टिपर ताब्यात घेण्यात आला.
दरम्यान या घटनेमुळे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद काय भूमिका घेणार? महसूल प्रशासन अशा वाळू माफियां बाबत कार्वाइची काय भूमिका घेणार? यांच्यावर कारवाई होणार का? याकडे आता सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.