अरिहंत स्कूलमध्ये शिक्षणाबरोबर संस्कारही दिले जातात – डॉ. शितल शहा
अरिहंतने शाळेने दर्जा व गुणवत्ता टिकून ठेवली - हभप बोधले महाराज
संपादक – दिनेश खंडेलवाल
अरिहंत स्कूलमध्ये शिक्षणाबरोबर संस्कारही दिले जातात – डॉ. शितल शहा
अरिहंतने शाळेने दर्जा व गुणवत्ता टिकून ठेवली – हभप बोधले महाराज
पंढरपूर(प्रतिनिधी):- मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे अरिहंत पब्लिक स्कूल या शैक्षणिक संस्थेने ४९ वर्षे पूर्ण करून आज पन्नासाव्या वर्षात प्रवेश केला आहे. अरिहंत मध्ये विद्यार्थी घडवले जातात या ठिकाणी केवळ शिक्षणच दिले जाते असे नसून शिक्षणाबरोबर संस्कारही दिले जातात अशी प्रतिक्रिया संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शितल शहा यांनी व्यक्त केली. अरिहंत पब्लिक स्कूलच्या पन्नासाव्या वर्षातील प्रथम कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले, ह भ प जयवंत महाराज बोधले, अध्यक्ष डॉक्टर शीतल शहा, सचिव उज्वल दोशी, प्राचार्य बहीरट मॅडम, पत्रकार वीरेंद्र उत्पात ,शोभाताई बडवे, तोंडे ताई, डॉ अनुप शहा,सौ. वैशाली दोशी,सौ. प्रतिभा दोशी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉक्टर शितल शहा पुढे म्हणाले की या संस्थेमध्ये आर्थिक दुर्बल घटकातील हुशार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देऊन त्यांना घडवले जाते. कोरोना काळामध्ये पालकांना दोन वर्षाची फी ५० टक्के माफ करण्यात आली होती. येथे असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनीही संस्थेला वेळोवेळी सहकार्य केले आहे. प्रोत्साहन दिले आहे. यामुळेच आज ही संस्था इथपर्यंत पोहोचू शकली, संस्थेचे हे छोटेसे रोपटे लावले होते. त्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाल्याचा अभिमान आहे.
यावेळी बोलताना ह भ प जयवंत महाराज बोधले म्हणाले की अध्यात्म्याच्या पायावर उभी राहिलेली भारतीय संस्कृती जोपासणारी संस्था म्हणून अरिहंत पब्लिक स्कूल कडे पाहिले जाते. शिक्षण आणि संस्कृती जोपासणारी ही शाळा आहे. शाळेचा दर्जा, गुणवत्ता टिकवून ठेवणे फार कठीण असते अशातही या शाळेने हे सर्व टिकवून ठेवले आहे. शहरातील चांगली शाळा कोणती असा विषय निघाल्यानंतर अरिहंत पब्लिक स्कूल या शाळेचा प्रथम उल्लेख केला जातो. शिक्षण ही काळाची गरज आहे. तर संस्कार ही जीवनाची गरज आहे. सध्याच्या काळात संस्कार जपत शिक्षण देणारी शाळा म्हणून अरिहंत कडे पाहिले जाते. या शाळेत विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान दिला जातो. आज समाजाला चांगल्या वृत्तीची चांगल्या व्यक्तीची गरज आहे. येथून शिक्षण घेऊन बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी चांगला व्यक्तिमत्व म्हणून बाहेर पडणार आहे. अत्यंत कमी कालावधीत नावारूपाला आलेले ही संस्था आज पन्नासाव्या वर्षात पदार्पण करून सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे.
यावेळी बोलताना संस्थेचे सचिव उज्वल दोशी म्हणाले की पंढरपूर शहरात १९७५ पासून सुरू झालेली संस्था आज ५० व्या वर्षात पदार्पण करत आहे. या संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या संस्थेला आजपर्यंत ज्यांनी मदत केली सहकार्य केले अशा सर्व मान्यवरांचे ऋण फेडण्यासाठी वर्षभरातील कार्यक्रमात बोलावून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. अरिहंत पब्लिक स्कूल मध्ये शिक्षकांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी मनापासून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच संस्कार देऊन घडवले आहे. या ठिकाणी एका कुटुंबाप्रमाणे सर्वजण कार्य करतात त्यामुळेच आज ही संस्था इथपर्यंत पोहोचली असून आम्ही सुद्धा काळाच्या मागे न राहता काळाबरोबर राहू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
प्रारंभी विद्यार्थ्यांनी वाद्य वाजवून तालासुरात संचलनाचे सादरीकरण केले. त्याचबरोबर लोकसभेचे कार्य कशा पद्धतीने चालते याचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या बनवलेल्या वस्तू व अभ्यासातून विज्ञानाकडे याचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. तसेच वय गटानुसार डान्स व खेळाचे सादरीकरण करण्यात आले. हे पाहण्यासाठी पालकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.