कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे 24 तास दर्शन
महानैवेद्य सहभाग योजनेच्या नोंदणीला प्रारंभ - व्यवस्थापक मनोज श्रोत्री
संपादक – दिनेश खंडेलवाल
कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे 24 तास दर्शन
महानैवेद्य सहभाग योजनेच्या नोंदणीला प्रारंभ – व्यवस्थापक मनोज श्रोत्री
पंढरपूर(प्रतिनिधी):- अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन कार्तिक यात्रेच्या पार्श्वभूमीवर आता 24 तास सुरू करण्यात येणार असल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
दरवर्षी कार्तिकी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता यात्रा कालावधीत चांगला मुहुर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते. यावर्षी दिनांक 04 नोव्हेंबर रोजी चांगला दिवस असल्याने विधिवत पुजा करून सकाळी 7.30 वाजता श्रींचा पलंग काढण्यात येणार आहे. तसेच विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात येणार आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे 24 तास मुखदर्शन, तर 22.15 तास पदस्पर्श दर्शन सुरू राहणार असल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
श्रींचा पलंग काढण्यात आल्यानंतर काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती इ. राजोपचार बंद होवून नित्यपुजा, महानैवेद्य व गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील. दिनांक 20 नोव्हेंबर (प्रक्षाळपुजा) पर्यंत 24 तास दर्शन उपलब्ध राहील. तसेच श्री विठ्ठल रूक्मिणीमातेस महानैवेद्य समर्पित करण्यासाठी रू.7,000/- देणगी देऊन महानैवेद्य सहभाग योजनेत सहभागी होता येते. त्याची दिनांक 01 जानेवारी, 2025 ते 31 डिसेंबर, 2025 या कालावधीतील नोंदणी देखील सुरू करण्यात आली आहे. त्याबाबतच्या अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या 02186 224466 व 223550 या क्रमांकावर व श्री संत तुकाराम भवन, पंढरपूर येथील देणगी कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केले आहे.