निवडणूक साहित्यासह मतदान अधिकारी कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे
पंढरपूर विधानसभा मतदार संघामध्ये ३५७ मतदान केंद्रावर होणार मतदान
संपादक – दिनेश खंडेलवाल
निवडणूक साहित्यासह मतदान अधिकारी कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे
पंढरपूर विधानसभा मतदार संघामध्ये ३५७ मतदान केंद्रावर होणार मतदान
• मतदान प्रक्रियेसाठी १ हजार ७८५ मतदान अधिकारी कर्मचारी नियुक्त
• ३ लाख ७३ हजार ६८४ मतदार बजवणार मतदानाचा हक्क
• सुरक्षेसाठी ६०२ पोलीस अधिकारी-कर्मचारी तैनात
पंढरपूर(प्रतिनिधी):- २५२ पंढरपूर विधानसभा मतदार संघातील मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असून, बुधवार दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी पंढरपूर विधानसभा मतदार संघातील ३५७ मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. या मतदान प्रक्रियेसाठी १ हजार ७८५ मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली.
पंढरपूर विधानसभा मतदार संघात १ लाख ९१ हजार ४६४ पुरुष मतदार तर १ लाख ८२ हजार १९४ स्त्री मतदार व इतर मतदार २६ असे एकूण ३ लाख ७३ हजार ६८४ मतदार आहेत. तसेच ५४१ सैनिक मतदार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर १ मतदान केंद्राध्यक्ष, ३ मतदान अधिकारी व १ शिपाई यांची नेमणूक केली आहे. विधानसभा मतदारसंघातील ३५७ मतदार केंद्रावर प्रत्येकी एक व्हीव्हीपॅट,एक कंट्रोल युनिट, दोन बॅलेट युनिट्स राहणार आहेत व ६७ ईव्हीएम मशीन राखीव राहणार आहेत. तसेच विधानसभा मतदारसंघात दिव्यांग कर्मचारी असलेले मतदान केंद्र १ आणि महिला कर्मचारी असलेले सखी मतदान केंद्र ३ तसेच ६ युवक मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत.
पंढरपूर विधानसभा मतदार संघातील १७८ मतदान केंद्रावर वेब कास्टिंग होणार आहे. तसेच मतदान प्रक्रीया निर्भयपणे पार पाडण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ६०२ पोलीस अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये २१ पोलीस अधिकारी तसेच ५८० ठाणे अंमलदार व होमगार्ड यांची नियुक्ती केली आहे. मतदान केंद्रांवर विविध सुविधा पुरविण्यात आल्या असून मतदारांना बसण्यासाठी व्यवस्था, शुद्ध व मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सावलीकरिता मंडप व्यवस्था, प्रसाधन गृह, हिरकणी कक्ष, ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध राहणारआहे. तसेच वैद्यकीय पथक, सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले आहेत.
पंढरपूर विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर नेऊन सोडणे व निवडणूक मतदान प्रक्रीया पार पाडल्यानंतर परत संबंधीत कर्मचारी यांना आणण्यासाठी ५० बसेस व १७ जीप अशा ६७ वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व वाहनांना जीपीएस यंत्रांना कार्यान्वित करण्यात आलेली आहे.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघात ४४७ मतदारांनी गृह मतदान केले यात ८५ वर्षांवरील ४०९ मतदारांचा तर ३८ दिव्यांग मतदारांनी मतदान केले. दि.१८ नोव्हेंबर २०२४ रोजी पर्यंत विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या १ हजार ९५६ अधिकारी कर्मचारी यांनी टपाली मतदान केले आहे.
पंढरपूर विधानसभा मतदार संघात दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे मतदारांनी लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होऊन आपला हक्क बजवावा व मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.