आमच्यासाठी सत्ता हे साध्य नसून ते जनसेवेचं साधन – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख महेशनाना साठे यांनी दिल्या शुभेच्छा
संपादक – दिनेश खंडेलवाल
आमच्यासाठी सत्ता हे साध्य नसून ते जनसेवेचं साधन – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख महेशनाना साठे यांनी दिल्या शुभेच्छा
पंढरपूर(प्रतिनिधी):- गेल्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये यशस्वी, गतिमान, वेगमान सरकारची कारकीर्द खऱ्या अर्थाने यशस्वी ठरली. आज जे बहुमत मिळाले ते जनतेसाठी केलेलं काम आहे. पूर्वी आम्ही ४० होतो आता ५७ अधिक ३ असे ६० झालो. ही देखील जनतेने दिलेल्या कामाची पोचपावती आहे. खऱ्या अर्थाने आमच्यासाठी सत्ता हे साध्य नसून ते जनसेवेचं साधन आहे. अशा प्रकारचं काम आम्ही केलं, मला काय मिळाले, पुढे काय मिळणार ही भावना मनात न ठेवता जनतेचं सरकार जनतेसाठी स्थापन केलं अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
शपथविधीनंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान यावेळी शिवसेनेचे सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख महेशनाना साठे यांनी राज्याचे नुतन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. या पत्रकार परिषदेत उपस्थित राहण्याचा मानही त्यांना मिळाला. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की या राज्याला विकासाकडे, प्रगतीकडे घेऊन जाणारं सर्वसामान्यांचे सरकार बाळासाहेब यांच्या विचारांचं हिंदुत्वांचं हे सरकार सर्वांना न्याय देणारं सरकार अडीच वर्षाचा ठरलं, गेल्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये राज्यातील जनतेची सेवा करण्याची संधी बाळासाहेब व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने मिळाली हे मी माझं भाग्य समजतो.
राज्यात व देशात एकाच विचाराचं सरकार असल्यामुळे केंद्राने राज्याला भरभरून पाठबळ दिलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांचेही अभिनंदन यावेळी त्यांनी केले. दोघांनी आमच्या व सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्यानेच न भूतो न भविष्यती अशा प्रकारचे काम केले. एकीकडे विकास प्रकल्प व दुसरीकडे कल्याणकारी योजना लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ या समाजातला प्रत्येक घटक या सरकारच्या पाठीशी राहिले होते.
नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांचेही अभिनंदन करतो. दोघांनीही मागील सरकारच्या कालावधीमध्ये चांगले योगदान देऊन एक टीम म्हणून काम केल्यानेच हे शक्य झालं. अडीच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी माझं नाव मुख्यमंत्री म्हणून सुचवलं होतं व आता देवेंद्र फडणवीस यांचं नाव मी मुख्यमंत्री म्हणून सुचवलं त्यांचा मुख्यमंत्री पदाचा अनुभव माझ्या मुख्यमंत्री कारकिर्दीत कामी आला त्यामुळेच हे सरकार यशस्वी कारकीर्द करू शकले व खऱ्या अर्थाने बहुमत मिळाले.
मी सीएम असताना नेहमी कॉमन मॅन म्हणून कार्यकर्ता म्हणून काम केलं आता मी डीसीएम म्हणजे डेडिकेटेड कॉमन मॅन म्हणून २४ तास काम करणार आहे. मला जसं सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी सहकार्य केले पाठिंबा दिला तसं सहकार्य व पाठिंबा मीही देणार आहे. राज्याला पुढे नेण्यासाठी एक टीम म्हणून आम्ही कुठेही कमी पडणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून अभिनंदन करत त्यांच्या नेतृत्वाखाली विकास गतिमान असा घडेल असेही त्यांनी सांगितले.