
संपादक – दिनेश खंडेलवाल
मंदिराच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र गृह रक्षक दलाच्या होमगार्ड बांधवांची नियुक्ती करा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पंढरपूर शहर अध्यक्ष दिगंबर सुडके यांची मागणी
पंढरपूर(प्रतिनिधी):- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने सुरक्षारक्षकाचा ठेका दिलेल्या बीव्हीजी कंपनीच्या सुरक्षारक्षकाकडून यात्रेदरम्यान दर्शन रांगेत उभारलेल्या भाविकांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला होता. याचबरोबर पदाचा गैरवापर करून व्हीआयपी दर्शन देणे यासह अनेक गैरप्रकार घडत असल्याने वादग्रस्त ठरत असणाऱ्या बीव्हीजी कंपनीचा ठेका रद्द करून मंदिराच्या सुरक्षेसाठी पोलिसांसोबत काम करणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत उत्तम सेवा बजावलेल्या सुरक्षेचे परिपूर्ण ज्ञान असणाऱ्या महाराष्ट्र गृहरक्षक दलाच्या होमगार्ड बांधवांची नियुक्ती करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांनी मंदिर समितीकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंदिर समितीला देण्यात आलेल्या निवेदनामध्ये मंदिर समितीकडून बीव्हीजी कंपनीला सुरक्षारक्षकाचा ठेका देण्यात आला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी तासनतास दर्शन रांगेत उभारल्यानंतर भाविकांना पदस्पर्श दर्शन मिळते. दरम्यान भाविकांवर दर्शना रांगेतून लघुशंकेला सुरक्षारक्षकाला सांगून गेलेल्या भाविकांना परत रांगेत उभारण्याच्या कारणावरून मारहाण झाल्याचे प्रकार समोर आल्याने सदर कंपनीने मंदिर समितीच्या नियमावलीनुसार सुरक्षारक्षक पुरवले पाहिजे होते. परंतु तसे न झाल्याने वारकरी भाविकांना वारंवार रक्तबंबळ होईपर्यंत मारहाण करणे, धक्काबुक्की करणे, अर्वाच्च भाषा वापरणे ही बाब गंभीर आहे. या सुरक्षारक्षकांना कोणतेही प्रशिक्षण दिले गेले नसल्याचे यावरून दिसून येत आहे. बीव्हीजी कंपनीकडून घेतलेले कर्मचारी हे नियमात बसतात का? याची खातरजमा केलेली दिसून येत नाही! सतत घडणाऱ्या घटनांवरून सदर कंपनीने नियमानुसार कामगार पुरवले नसल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. याबाबत चौकशी करून बीव्हीजी कंपनीचे कर्मचारी व कंपनीचे मालक, कार्यकारी संचालक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच मंदिर समितीने सुरक्षारक्षक पुरवण्यासाठी ठेका देण्याऐवजी पोलिसांसोबत काम करणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत उत्तम सेवा बजावणाऱ्या आणि सुरक्षेचे परिपूर्ण प्रशिक्षण असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा दालातील होमगार्ड बांधवांची नियुक्ती मंदिर सुरक्षेसाठी करावी. यामुळे मंदिर समितीचा आर्थिकभार कमी होऊन भाविकांना चांगली सुरक्षा मिळेल व मंदिर समितीची होणारी बदनामी टाळता येईल अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर, तसेच याची प्रत जिल्हाधिकारी सोलापूर यांना पाठवण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांनी दिली आहे.