
संपादक – दिनेश खंडेलवाल
पंढरीत तृतीयपंथीयांनी हक्काचं घर,नोकरीची केली मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी
केंद्र सरकारच्या योजनेतून बचत गट, रोजगाराची संधी मिळणार
पंढरपूर(प्रतिनिधी):- शहरातील ४० ते ५० तृतीयपंथी एकत्र येत आज पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्याकडे राहण्यासाठी हक्काचे घर तसेच जीवन जगण्यासाठी हाताला काम किंवा नोकरी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करत या मागणीचे निवेदन देण्यात आले.
भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण तात्या शिरसट, भाजप माजी तालुका अध्यक्ष विक्रम शिरसट, आरपीआयचे दीपक चंदनशिवे यांच्या माध्यमातून तृतीयपंथीयांना सन्मानपूर्वक वागणूक मिळवून देण्यासाठी तृतीयपंथी व त्यांचे गुरु श्री यल्लमादेवी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष परसू पवार यांनी प्रयत्न केले.
समाजात तृतीयपंथी व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. काही लोक त्यांना सहानुभूतीने आणि समजूतदारपणे पाहतात, तर काही लोक अजूनही त्यांना स्वीकारायला तयार नाहीत. घरच्या मंडळींकडून तिरस्कारची वागणूक मिळत असल्याने तृतीयपंथीयांना आपल्या गुरुच्या घरी छोट्याशा खोलीत दहा ते पंधरा जण एकत्र राहून अत्यंत हिन दर्जाचे जीवन जगावे लागत आहे. शहरात वास्तव्यास असलेल्या तृतीयपंथी बांधवांना भाड्याने ही घर मिळत नाही. रस्त्यावर व बाजारात मागून त्यांना आपली गुजराण करावी लागत आहे.
दरम्यान मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी तृतीयपंथी बांधवांच्या व्यथा जाणून घेऊन सकारात्मक चर्चा केली. सदर बैठकीत तृतीयपंथीयांना केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी तृतीयपंथीयांचा बचत गट स्थापन करण्यात येणार असून त्यांना नगरपालिकेच्या वतीने रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. अशी माहिती सिमा माने, नगमा गायकवाड, वैष्णवी वाघमारे, निता वाकचवरे, आयशा गायकवाड, दुर्वा भोसले, ज्योती, मिनाबाई, आनिता,जया या तृतीयपंथींनी दिली.
यावेळी मोठ्या संख्येने तृतीयपंथी बांधव उपस्थित होते.
देशातील तृतीयपंथीयांसाठी केंद्र सरकारने विविध योजना राबवली असून या योजनेच्या माध्यमातून तृतीयपंथीयांना लाभ मिळू शकतो त्या माध्यमातून त्यांचे बचत गट तसेच त्यांच्या नोकरीसाठी ही प्रयत्न करू शहरातील अतिक्रमण पथकांमध्ये सामावून घेऊन या व्यतिरिक्त लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
महेश रोकडे
मुख्याधिकारी पंढरपूर नगरपरिषद ]