
संपादक – दिनेश खंडेलवाल
पंढरपूर तालुक्यात सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ;डॉक्टर नसताना करत होते उपचार
परप्रांतीय तोतया डॉक्टरांची टोळी कार्यरत;
तालुका पोलिसांनी तिघांच्या आवळल्या मुसक्या
पंढरपूर(प्रतिनिधी):- सर्वसामान्य रुग्ण नागरिकांना डॉक्टर म्हणजे देवदूत असल्यासारखे असते कोणत्याही व्यक्तीला आजार झाला तर तो प्रथम डॉक्टरांकडे जातो व उपचार करून घेतो ज्या विश्वासाने सर्वसामान्य रुग्ण डॉक्टरांकडे जातात त्याच वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासण्याचे काम सध्या पंढरपूर तालुक्यात राजरोसपणे बोगस डॉक्टरांच्या टोळीकडून होऊ लागले आहे. राजस्थान व हरियाणा या पर प्रांतातील व्यक्ती सध्या पंढरपूर तालुक्यात कोणतीही वैद्यकीय डिग्री नसताना आपण डॉक्टर असल्याचे सांगत सर्वसामान्यांवर उपचार करून त्यांच्या जीवाशी खेळत आहेत. पंढरपूर तालुक्यातील काही गावात बोगस डॉक्टर असल्याची माहिती पोलिसांना मिळताच तिघांच्या मुसक्या आवळण्यात तालुका पोलिसांना यश आले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी तीन-चार लोक डॉक्टर म्हणून कोणतीही वैद्यकीय डिग्री नसताना सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करत आहेत. अशी माहिती पंढरपूर तालुका पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे मौजे रोपळे गावांत पंढरपूर तालुका पोलिसांचे पथक मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी पोहोचले त्या ठिकाणी परप्रांतीय असलेले तीन व्यक्ती कोणतीही वैद्यकीय डिग्री नसताना स्वतः डॉक्टरच आहे असे सांगत उपचार करत होते. तिघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपले नाव गोविंदा देवीराम प्रजापती (वय २६) राहणार भरतपूर राजस्थान, जाहीर खान (वय २२) राहणार पलवल जिल्हा राज्य हरियाणा व आसिफ दिनमोहम्मद राहणार भरतपुर राजस्थान येथील असल्याचे सांगितले.
दरम्यान त्यांच्याकडे आपण डॉक्टर म्हणून तपासणी करत आहात आपणाकडे कोणती वैद्यकीय डिग्री आहे का? असे विचारले असता त्यांनी कोणतीही वैद्यकीय अधिकृत डिग्री अथवा सर्टिफिकेट नसल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्या सामानाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात इंजेक्शन, इंजेक्शन साठी वापरण्यात येणारे लहान मोठ्या औषधाच्या बाटल्या, सिरीज,टॅबलेट्स व इतर साहित्य मिळाले. सर्व वस्तूंचा पंचनामा करून जप्त करून ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्ती हे डॉक्टर आहे अशी बतावणी करून रोपळे गावांतील व परिसरातील लोकांची फसवणूक करून उपचार करत असल्याचे निदर्शनास आले. या तिनही व्यक्तीं विरुद्ध मेडिकल प्रॅक्टिशनर ऍक्ट १९५६ कलम १५ /२ व महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर अॅक्ट १९६१ कलम ३३ नुसार बीएनएस कलम ३१८/४/ ३१९/२/ ३/५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान सदर आरोपींची राजस्थान, हरियाणातील टोळी असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले असून त्यांनी रोपळे गावातील व्यक्तीशी बीड येथील राहणारा आरोपी सतीश सोळंकी याच्या मध्यस्थीने दिनांक २९ ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता शेतातील रूम भाड्याने घेऊन दिलेली होती. त्यानंतर सकाळी आठ वाजल्यापासून वरील तिन्ही लोक हे आपण डॉक्टर आहोत अशी बतावणी करून त्या ठिकाणी लोकांना इंजेक्शन औषध गोळ्या देत होते. सदर गुन्ह्यात वरील तिनही आरोपींना पंढरपूर तालुका पोलिसांनी अटक केलेली असून आणखीन दोन आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
पंढरपूर तालुका पोलिसांचे जनतेला आवाहन..
[ पंढरपूर तालुका पोलिसांकडून सर्व तालुक्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की कुठल्याही डॉक्टरांची अधिकृत वैद्यकीय डिग्री सर्टिफिकेट असल्याची खात्री झाल्याशिवाय कोणत्याही तोतया डॉक्टर यांचे कडे उपचार करून आपले जीव धोक्यात घालू नये. ]
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर ,सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, पोलीस उपनिरीक्षक विक्रम शेठ वडणे, पोलीस हेडकॉन्स्टेबल स्वप्नील वाडदेकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल साजन भोसले, पोलीस हेडकॉन्स्टेबल इरफान शेख, पोलीस कॉन्स्टेबल घोंगाने, चालक पोलीस कॉन्स्टेबल घाडगे, नदाफ, चाटे यांच्या पथकाने केली आहे.