
संपादक – दिनेश खंडेलवाल
फुले शाहू आंबेडकर विचारमंच च्या वतीने गौतम विद्यालयास “संविधान” प्रत भेट
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्व शाळांना देणार भेट
पंढरपूर(प्रतिनिधी):- भारतीय संविधान अमृत महोत्सवा निमित्त फुले शाहू आंबेडकर विचारमंच पंढरपूरचे वतीने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त पंढरपूर तालुक्यातील माध्यमिक विद्यालयास मोफत भारतीय संविधानाचे वाटप करण्याचे ठरवुन याची सुरुवात गौतम विद्यालय पासून करत “संविधान” प्रत मुख्याध्यापक नंदकुमार वाघमारे यांना भेट देण्यात आली.
यावेळी विचारमंचाचे अध्यक्ष सुनील वाघमारे म्हणाले की पंढरपूर शहर व तालूक्यातील सर्व माध्यमिक शाळेस आम्ही “संविधान” प्रत भेट देणार असून या उपक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे गौतम विद्यालय येथून आम्ही सुरुवात करत आहोत. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी पंढरपुरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी गौतम विद्यालय पंढरपूरचे मुख्याध्यापक नंदकुमार वाघमारे यांनी या उपक्रमाचे स्वागत केले.
यावेळी गौतम विद्यालयाचे माजी मुख्यध्यापक व फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे खजिनदार दादासाहेब दोडके सर यांनी प्रास्ताविक भाषणात विचारमंचाची भूमिका स्पष्ट करून या उपक्रमाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एसपी रूपनर सर यांनी केले तर आभार गोसावी मॅडम यांनी मानले.
यावेळी फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे सदस्य विवेकवर्धिनी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य राजेंद्र पाराध्ये सर,उपाध्यक्ष ऍड. कीर्तीपाल सर्वगोड, सल्लागार श्रीकांत कसबे, सदस्य व्ही.एस. कांबळे सर सेवागिरी गोसावी, सुखदेव माने आदी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. सामूहिक संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. वेळी विचार मंचच्या उद्दिष्टाचे पत्रक विद्यार्थ्यांना व शिक्षकांना वाटण्यात आले.