
संपादक – दिनेश खंडेलवाल
मोहोळ तालुक्यातील पूरग्रस्त मलिकपेठ गावात जिल्हाधिकारी आशीर्वाद यांची पाहणी
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या आदेशानुसार तातडीच्या मदतीचे दिले निर्देश
पंढरपूर(प्रतिनिधी):- मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथे मागील काही दिवसात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, तहसीलदार सचिन मुळीक उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागातील प्रत्यक्ष भेटी दरम्यान ज्या घरांमध्ये पाणी शिरले असून त्यामुळे नुकसान झाले आहे अशा ठिकाणाचे पाहणी केली. दरम्यान ज्या घरांचे पाण्यामुळे नुकसान झाले आहे अशा घरांना दोन दिवसांत प्रत्येकी दहा हजार रुपये थेट बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
ग्रामस्थांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी प्रशासनाच्या वतीने पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या फूड पॅकेट्स, पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा व अन्य मदतीबाबत विचारणा केली. ग्रामस्थांनी प्रशासनाकडून मदत मिळत असल्याचे यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी यांनी पूरग्रस्त नागरिकांच्या घरी थांबून महिलांशी अत्यंत नम्रतेने संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. व प्रशासन आपल्याला सर्व प्रकारची मदत करेल असे त्यांनी सांगितले. मलिकपेठ येथील पुलावर जाऊन त्यांनी पाण्याच्या पातळीची माहिती घेतली तसेच झालेल्या नुकसानीचा आढावा तहसीलदारांकडून घेतला.
स्थानिक प्रशासनाने अत्यंत दक्ष राहून सर्व पूरग्रस्तांना मदतीचे काटेकोर नियोजन करावे असेही त्यांनी सुचित केले. यामुळे बाधित झालेल्या पूरग्रस्तांच्या अशा थोड्याफार पल्लवीत झाल्याचे दिसून आले.