
संपादक – दिनेश खंडेलवाल
अतिवृष्टी, पूरग्रस्तांच्या पंचनाम्यात अडथळे निर्माण करू नका – सचिन पाटील
शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी स्वाभिमानींचा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
पंढरपूर(प्रतिनिधी):- अतिवृष्टी आणि महापूरामुळे पंढरपूर तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले असताना त्यांच्या मागण्यांकडे शासनाने तात्काळ लक्ष द्यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज तहसीलदार व कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांच्या सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करावेत, ऊस बिलातून होणारी १५ रुपये कपातीला तात्काळ स्थगित करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करून प्रत्येक शेतकऱ्याला रुपये ५० हजार मदत व कर्जमाफी द्यावी.
या वेळी शेतकरी नेते सचिन पाटील यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले, “तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला अडथळा निर्माण करत आहेत. मुख्यमंत्री स्वतः सरसकट पंचनाम्याच्या सूचना देत आहेत आणि तरीसुद्धा अटी-शर्ती सांगून शेतकऱ्यांना फिरवले जात आहे. बाधित व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना जर आता त्रास दिला, तर गावागावातल्या कार्यालयांपुढे आम्ही आंदोलन करू आणि भ्रष्टाचाराच्या प्रत्येक प्रकरणाची चौकशी अँटी करप्शनमार्फत करून घेऊ.”
तसेच ऊस बिलातून होणारी कपात थांबवण्याची मागणी करताना त्यांनी सरकारवरही टीका केली. “पूरात ऊस खराब झालेल्या शेतकऱ्यांना कमी अवरेज मिळत असताना सरकारच त्यांच्या खिशात हात घालत आहे. हे शेतकऱ्यांवर अन्याय आहे,” असे ही ते म्हणाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष दिले नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला.
[ “शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनाम्यात त्रास दिला, तर गाठ आमच्याशी आहे. प्रत्येक गैरप्रकार बाहेर काढून अँटी करप्शनला देऊ!”– सचिन पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटना ]