अभिजीत पाटील यांची माढा मतदारसंघात प्रचारात आघाडी
पंढरपूर तालुक्यातील गृहभेटी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन अभिजीत पाटील यांचा महीलांनी केला प्रचार
संपादक – दिनेश खंडेलवाल
अभिजीत पाटील यांची माढा मतदारसंघात प्रचारात आघाडी
पंढरपूर तालुक्यातील गृहभेटी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन अभिजीत पाटील यांचा महीलांनी केला प्रचार
पंढरपूर(प्रतिनिधी):- माढा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून गावभेट दौरे, राज्यस्तरीय नेत्यांच्या जाहीर सभा आणि होम टू होम प्रचाराबरोरच त्यांचे कार्यकर्ते आता थेट शेताच्या बांधापर्यंत जावून शेतकऱ्यांना विकासाचे व्हिजन सांगत आहेत. त्यामुळे ‘आपला माणूस’ म्हणून मतदारांची त्यांना पसंती मिळत आहे.
अभिजीत पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखाना लोकशाही मार्गाने ताब्यात घेतला त्याच वेळी विधानसभा लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मागील तीन महिन्यात माढा मतदारसंघात खेळ पैठणीचा, होम मिनिस्टर, माढा कुस्ती केसरी, दहीहंडी, रक्तदान शिबिर, बैलगाडा शर्यत, आदी कार्यक्रम घेऊन आपले नाव घराघरात पोहचवले व कसल्याही परिस्थितीत माढ्याच्या रिंगणात उतरायचेच असे ठरवले. त्यातूनच जनमताचा कौल असणाऱ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यात यश मिळवत अर्धी लढाई जिंकली. साहजिकच प्रतिस्पर्धी शिंदे गटाचे कट्टर विरोधक मोहिते-पाटील यांनी आपली पूर्ण ताकद पाटील यांच्या पाठीशी उभी करत प्रचारात उडी घेतली आहे.
माजी उपमुख्यमंत्री विजयदादा यांच्यासह खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, शिवतेजसिंह मोहिते-पाटील प्रचारात दररोज सक्रिय आहेत. याशिवाय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या अनुक्रमे उपळाई (ता.माढा) व करकंब येथे जाहीर सभा झाल्या. त्यावेळी वातावरण निर्मिती होण्यास मदत तर झालीच पण अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनीही श्री.पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला. याशिवाय दररोजच्या गाव भेटी दरम्यानही अनेक कार्यकर्ते पाठिंबा देत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे माढा तालुक्यातून माजी जिल्हा परिषद सदस्य भारत आबा शिंदे, संजय कोकाटे, संजय पाटील-घाणेकर, नितीन कापसे यांच्यासह टेंभुर्णी येथील कुटे आणि बोबडे परिवाराने श्री. पाटील यांच्या पाठीशी उभी केलेली ताकद निर्णायक ठरत आहे. दुसरीकडे रणजितसिंह शिंदे यांना शिवसेनेच्या शिवाजी सावंत आणि पंढरपूर तालुक्यातुन परिचारक गटाचा पाठिंबा जाहीर झाला असला तरी हे दोन्ही गट महायुतीचे घटक असल्याने श्री.शिंदे यांची उमेदवारी म्हणजे महायुतीचीच उमेदवारी असा समज पसरू लागला आहे. त्याचाही त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे अभिजित पाटील यांच्यासाठी रोहित पवार आणि शरद पवार यांच्या जाहीर सभा होणार आहेत. अशा वरिष्ठ नेत्यांच्या प्रचार सभांचा पाटील यांना फायदा होत असताना श्री.शिंदे अपक्ष निवडणूक लढवत असल्याने त्यांना स्वतःलाच सर्व प्रचार यंत्रणा संभाळावी लागत आहे.