“वाचनाची तहान भागल्यावर आत्मिक समाधान मिळते.” :- रवि वसंत सोनार
सोनार दांपत्यांकडून ब्रेल लिपीतील पुस्तके भेट...!
लोकपत्र न्यूज
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : “पुस्तकांच्या माध्यमातून माणसाची वाचनाची तहान भागते आणि त्यामुळे वाचकास आत्मिक समाधान मिळते.” असे मत येथील सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार यांनी व्यक्त केले. ते त्यांच्या जन्मवर्ष सुवर्णमहोत्सवाच्या औचित्याने संकल्पित कला, क्रीडा, आरोग्य, साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक आदी विभागातील उपक्रमांतर्गत येथील पंढरपूर लायन्स क्लब यांची अंध विकास संस्था संचलित शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळेमध्ये ब्रेल लिपीतील पुस्तके भेट देण्याच्या शैक्षणिक उपक्रमावेळी बोलत होते. लुई ब्रेल दिवसाच्या औचित्याने आयोजित या कार्यक्रमात पुढे बोलताना म्हणाले की, “लुई ब्रेल यांच्या माध्यमातून अंध व्यक्तींना बोटांच्या साहाय्याने वाचनाची एक परिपूर्ण पद्धत व लिपी विकसित केली आहे. आज जगभरात ही लिपी सर्वमान्य आहे. आणि असंख्य अंध व्यक्ती या लिपीच्या माध्यमातून पुस्तके वाचून आत्मिक समाधान मिळवत आहेत.”
पंढरपूर लायन्स क्लब यांची अंध विकास संस्था संचलित शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळेमध्ये माजी मुख्याध्यापक सौ. शोभाताई माळवे, नितीन कटप, महेश म्हेत्रे, अनिल कुंभार, सुनिल व्यवहारे, लक्ष्मी यादव, शोभा घाटे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत लुई ब्रेल यांच्या प्रतिमेचे पूजन सौ. सविता रवि सोनार आणि सौ. मनिषा सचिन कुलकर्णी यांच्या हस्ते आणि करण्यात आले. तर याप्रसंगी श्री. व सौ. सोनार यांनी अंधशाळेच्या ग्रंथालयास कवयित्री शांता शेळके याच्या जन्मशताब्दी वर्षांच्या औचित्याने तोच चंद्रमा हा काव्यसंग्रह आणि याचबरोबर ब्रेल लिपीतील इतरही पुस्तके स्नेहभेट म्हणून दिली.
लुई ब्रेल दिवसाच्या औचित्याने संपन्न झालेल्या या उपक्रमावेळी साहित्यिक व ज्योतिष अभ्यासक राधेश बादले-पाटील, ख्यातनाम गझलकार सचिन कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते आनंद नगरकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष बारहाते सर यांनी केले. सूत्रसंचालन रोहिणी घोडके यांनी केले. तर उमा कुलकर्णी यांनी आभार मानले. हा शैक्षणिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी कवी रवि सोनार स्नेह परिवाराच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
बातमी व जाहिरात साठी संपर्क- दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com