पंढरपूर विधानसभा मतदार संघात होणार चौरंगी लढत
२४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, १४ उमेदवारांनी घेतली माघार

संपादक – दिनेश खंडेलवाल
पंढरपूर विधानसभा मतदार संघात होणार चौरंगी लढत
२४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, १४ उमेदवारांनी घेतली माघार
पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ३८ उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले होते. यामध्ये २४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असून १४ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. दरम्यान पंढरपूर विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होणार असल्याचे दिसून येते.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महाआघाडी कडून दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिल्याने मतांची विभागणी होणार आहे. याचा फायदा भाजपचे उमेदवार समाधान दादा अवताडे यांना होणार असे बोलले जात आहे. तर मनसेचे उमेदवार यांनी केलेल्या कामासाठी मताची विभागणी झाल्यास आपला विजय निश्चित असल्याचे मनसे कार्यकर्त्यातून बोलले जाते.
पूर्वीपासूनच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात आहे. या ठिकाणी शरद पवार यांची मतदारांवर पकड असून त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता अनिल दादा सावंत यांच्या कार्यकर्त्यातून व्यक्त केली जात आहे. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकी दरम्यान काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती ताई शिंदे यांना भगीरथ दादा भालके यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य देऊन विजयी केल्याने त्यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत अवघ्या तीन हजार सातशे मताच्या फरकाने त्यांचा पराजय झाला होता. परंतु आता आपला विजय निश्चित असून स्वर्गीय भारत नाना भालके यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने भालके यांच्या कार्यकर्त्यातून विजयाची खात्री वर्तवली जाऊ लागली आहे. विद्यमान आमदार समाधान दादा अवताडे यांनी मतदारसंघात कोट्यावधी रुपयाचा निधी आणून विविध विकास कामे करत अनेक प्रश्न मार्गी लावल्याने केलेल्या विकास कामाच्या जोरावर पुन्हा एकदा मोठ्या फरकाच्या मताधिक्याने समाधान आवताडे निवडून येतील असा विश्वास अवताडे समर्थकातून व्यक्त केला जात आहे.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध पक्षांचे नऊ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असून १५ उमेदवार अपक्ष म्हणून उभे राहिले आहेत. त्यामध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे या चार उमेदवारांमध्ये तुल्यबळ अशी चौरंगी लढत पाहायला मिळणार असल्याचे चित्र दिसत असल्याने या निवडणुकीमध्ये रंगत वाढणार आहे.