पंढरपूर कॅरीडोर प्रस्ताव रद्द करण्यासाठी पुरुष महिलांचे लाक्षणीक उपोषण
पश्चिमद्वार परिसरात कॅरीडाॅर विरोध उपोषणाला मोठा प्रतिसाद
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर कॅरीडोर प्रस्ताव रद्द करण्यासाठी पुरुष महिलांचे लाक्षणीक उपोषण
पश्चिमद्वार परिसरात कॅरीडाॅर विरोध उपोषणाला मोठा प्रतिसाद
पंढरपूर : पंढरपूर हे दक्षिण काशी म्हणून परिचित असल्याने या ठिकाणी विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात परंतु मंदिर परिसरात राहणारे रहिवाशांचा उदरनिर्वाह आणि निवासाची जागा कॅरिडोर साठी वापरण्यात येणार असल्याने या प्रस्तावित कॅरिडोरला विरोध करण्यासाठी आज मंदिर परिसरातील बाधित होणार्या कुटुंबातील नागरिक रस्त्यावर येत महिला आणि पुरुषांनी लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार प्रशासनाने पंढरपूर विकास आराखडा तयार केला यामध्ये वाराणसीच्या धरतीवर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरात कॅरीडोर साठी भूसंपादन तसेच यापूर्वी मंजूर असलेल्या विकास आराखडा मधील रस्तेही अन्यायकारक व अनावश्यक रित्या वाढवण्यात आले आहेत. या सर्व गोष्टीमुळे विकासाच्या नावाखाली प्राचीन पंढरपूर उध्वस्त होणार असे दिसत आहे.
येथील नागरिकांचा विकासाला विरोध नसून एक चांगले विकसित तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचे नावलौकिक वाढले पाहिजे ही अपेक्षा आणि भूमिका उपोषणकर्त्या नागरिकांनी व्यक्त केली आहे. यासाठी सोलापूर जिल्हा पालकमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पंढरपूरच्या विकासाचा एक परिपूर्ण आराखडा वारकरी संप्रदाय व बचाव समिती यांच्या वतीने सादर करण्यासाठी वेळ मागितली व सुदैवाने पालकमंत्र्यांनी एक महिन्याचा कालावधी नागरिकांच्या विकास आराखडा बनवण्यासाठी दिला व तशा सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.
त्यानुसार विकासाचा आराखडा बनवण्याचे काम सुरू असताना शासन मात्र आपलाच विकास आराखडा दमटवण्याच्या तयारीत आहे का? असा प्रश्न उपोषणकर्त्यातून व्यक्त केला जाऊ लागला आहे. व तशी शंका येत असल्याचे बोलले जाते. नगरपालिकेमार्फत मंदिर परिसरात सर्वेक्षण व मोजमापे माहिती गोळा करणेचे काम चालू आहे.
वृत्तपत्रांमध्ये पंधराशे कोटी रुपये खर्चाची विकास आराखडा तयार करून देण्यासाठी कार्पोरेट एजन्सींना निमंत्रित केले जात आहे. या सर्व प्रकारामुळे येथील नागरिकांना आराखडा तयार करण्यास सांगितलेला होता व तो तयार केल्याचे पाहणे केवळ औपचारिकता असल्याचे दिसून येते मात्र प्रत्यक्षात शासन व प्रशासनाच्या मनात दुसरे चालू आहे ही शंका येण्यास निश्चित वाव मिळत असल्याने आज मंदिर परीसरातील विकास कामांमध्ये बाधित होणारे नागरिक महिला सुरू असलेल्या लाक्षणिक उपोषणात सहभागी झाले आहेत.या उपोषणाद्वारे पुन्हा एकदा अन्यायकारक विकास आराखडा रद्द करून सर्वांना विश्वासात घेऊनच विकास आराखडा तयार करण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे.
जर शासनाकडून यास सकारात्मक प्रतिसाद मिळत नसेल तर हे आंदोलन अधिकाधिक तीव्र होत जाईल याची शासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन ही आज आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला देण्याची तयारी ठेवली आहे.