चैत्री यात्रेत भाविकांना सुलभ व जलद गतीने दर्शनव्यवस्था उपलब्ध करणार-सह अध्यक्ष
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या बैठकीत निर्णय
संपादक-दिनेश खंडेलवाल
चैत्री यात्रेत भाविकांना सुलभ व जलद गतीने दर्शनव्यवस्था उपलब्ध करणार-सह अध्यक्ष
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या बैठकीत निर्णय
पंढरपूर : तिर्थक्षेत्र पंढरीत
चैत्री यात्रा एकादशी रविवार दि. २ एप्रिल २०२३ रोजी संपन्न होत आहे. या यात्रेला येणा-या भाविकांना सुलभ व जलद गतीने दर्शनव्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच दर्शनरांगेत बॅरीकेटींग करणे, कायमस्वरूपी पत्राशेड येथे जादा तात्पुरते पत्राशेड उभारणे, या दर्शनरांगेत मॅट टाकणे, बसण्याची सुविधा, पिण्याचे पाणी, लाईव्ह दर्शन इ. सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची चैत्री यात्रा २०२३ नियोजनाबाबतची सभा आज दिनांक २५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सह अध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज(औसेकर) यांचे अध्यक्षतेखाली श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास येथे दुरदृष्य प्रणालीद्वारे बैठक संपन्न झाली. यावेळी औसेकर बोलत होते.
या सभेस सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे, डॉ.दिनेशकुमार कदम, भास्करगिरी महाराज, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), ह.भ.प.प्रकाश जवंजाळ तसेच व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व लेखा अधिकारी अनिल पाटील उपस्थित होते.
सदर बैठकीत आपत्कालिन व सुरक्षा व्यवस्थेसाठी स्वयंसेवकांची नियुक्ती, देणगी व्यवस्थेकामी जादा स्टॉल, स्वच्छता व्यवस्थेकामी स्वयंसेवी संस्थांची मदत घेणे, उपजिल्हा रूग्णालयामार्फत व स्वयंसेवी संस्थेमार्फत दर्शनमंडप येथे वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे, दर्शनरांगेतील भाविकांना दशमी, एकादशी व द्वादशी दिवशी खिचडी, लिंबू सरबत, ताक,मठ्ठा मोफत वाटप करणे, पुरेसा प्रमाणात बुंदी व राजगिरा लाडूप्रसाद व्यवस्था करण्यात येणार आहे. तर दुपारी १२ ते २ व सायंकाळी ७:३० ते ९ या वेळेत मोफत अन्नछत्र उपलब्ध करून देण्यात येत आहे.
[श्रींची नित्यपूजा यांच्या हस्ते—- चैत्र शुध्द एकादशी (दि.02एप्रिल) दिवशी श्री.विठ्ठल व श्री.रूक्मिणी मातेची नित्यपूजा पहाटे 4 ते 5 या वेळेत अनुक्रमे मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर) व ॲड.माधवी निगडे यांच्या हस्ते करण्यात येत आहे.]
[चैत्री यात्रेतील सर्व परंपरांचे पालन करण्यात येणार आहे. भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येनार आहेत. त्या दृष्टीने नियोजन सुरू आहे.
– सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर]