आज पंढरपूर पंचायत समितीत भरणार देगांवची शाळा!!
शिक्षकाच्या अवैध बदलीचा देगाव ग्रामस्थ व विद्यार्थी करणार गांधीगिरीने निषेध
आज पंढरपूर पंचायत समितीत भरणार देगांवची शाळा!
शिक्षकाच्या अवैध बदलीचा देगाव ग्रामस्थ व विद्यार्थी करणार गांधीगिरीने निषेध
पंढरपूर : कोणतेही कारण न सांगता पंढरपूर तालुक्यातील देगाव जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाची अचानकपणे दुसऱ्या शाळेवर अवैध बदली करण्यात आली आहे. यामुळे या शाळेतील दोन वर्गांतील विद्यार्थ्यांचे गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत पंढरपूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला वारंवार कळवूनही गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने याचा विरोध करण्यासाठी व तात्काळ दोन शिक्षकांची नेमणूक करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे याकरिता सोमवार दि.२७ मार्चपासून देगाव ग्रामस्थ व देगाव शालेय व्यवस्थापन समिती तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांकडून गांधीगिरीने पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या आवारात शाळा भरवली जाणार आहे. याबाबत पंढरपूर पंचायत समितीला निवेदनाद्वारे सूचित करण्यात आलेले आहे.
एकीकडे शासनाकडून जिल्हा परिषद शाळा टिकाव्या व मुलांची पटसंख्या वाढावी याकरिता राज्य शासन व शिक्षणमंत्री यांच्याकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. मात्र त्याचवेळी दुसरीकडे अतिशय उदासीन असणाऱ्या पंढरपूर पंचायत समितीतील काही अधिकाऱ्यांमुळे व त्यांच्या मनमानी कारभारामुळे या पंचायत समितीच्या शिक्षण विभागाची मोठी बदनामी होताना दिसत आहे.
पंढरपूर पंचायत समितीमधील गटशिक्षणाधिकारी कुणाचाच फोन घेत नाहीत तसेच त्यांच्या कार्यालयात येऊनही कुणालाही भेटत नाहीत ही तक्रार नेहमीचीच आहे. त्यांच्या मनमानी कारभाराबाबत अशा वारंवार तक्रारी प्राप्त होत असताना शिक्षण विभागाचा मात्र त्यांना अभय असल्याचे दिसत आहे. देगाव जिल्हा परिषद शाळेत पटसंख्येनुसार या शाळेत अगोदरच दोन शिक्षकांची कमतरता आहे. याबाबत शिक्षक मिळावा म्हणून या शाळेकडून गेल्या वर्षभरापासून मागणी करण्यात येत आहे मात्र असे असतानाही या शाळेवरील एका शिक्षकाची कोणतेही कारण न देता अचानकपणे दुसऱ्या शाळेत नेमणूक करण्यात आलेली आहे. सदर शाळेत पूर्वीपासूनच एक ते दोन शिक्षक कमी असताना गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सदर शिक्षकाची देगाव शाळेतून बाहेरच्या शाळेत नेमणूक देण्यात आलेले आहे.
सदर नेमणूक कोणत्या नियमाच्या आधारे करण्यात आली हेही सांगण्याची तसदी शिक्षण विभागाने घेतलेली नाही त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी व अधिकाऱ्यांच्या मनमानीला विरोध करण्यासाठी गांधीगिरीने सोमवारी पंचायत समितीच्या आवारात शाळा भरवून आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत गटशिक्षण अधिकारी नाळे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता नेहमीप्रमाणे त्यांनी फोन उचलला नाही.
वर्षभरापासून अनेक महत्वाचे प्रस्ताव पडले धूळखात———————
तालुक्यातील शाळांचे ८ वी च्या नवीन वर्गाला मान्यता देणे,कमी असणारे शिक्षक मिळणे,तसेच धोकादायक शाळा इमारत पाडकामास मंजुरी मिळणे यासारखे अत्यंत महत्वाचे प्रस्ताव पंढरपूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांच्या उदासीन कामकाजामुळे धूळखात पडून आहेत. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे यावर सोलापूर शिक्षण विभाग काय निर्णय घेणार ते पाहणे कुतूहलाचे ठरणार आहे.
[“जिल्हा परिषदेची शाळा टिकावी तिची गुणवत्ता वाढावी यासाठी आम्ही सर्व गावकरी मिळून मोठ्या प्रमाणात लोक वर्गणीच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करत आहोत.आमच्या गावात दोन तास अभ्यासासाठी यासारखे उपक्रम राबवले जात आहेत. त्याचवेळी मात्र आपल्या गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून आमचे जाणीवपूर्वक खच्चीकरण केले जात आहे व मराठी शाळा बंद पाडण्याचा डाव आखला जात आहे. अशा मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कर्तव्यदक्ष शिक्षणाधिकारी व शिक्षणमंत्री यांनी कारवाई करणे गरजेचे आहे.ज्यामुळे शिक्षण विभागाची बदनामी होणार नाही.”
श्री गणेश शंकर लेंडवे
अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती देगाव]