सामाजिक

पंढरीत गोपाळकाल्याने आषाढी यात्रेची सांगता

गोपाळपूर ग्रामपंचायतीच्यावतीने सर्व पालख्यांचे स्वागत

संपादक-दिनेश खंडेलवाल

पंढरपूर : गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला या जयघोषात अवघी श्रीकृष्णनगरी म्हणजेच गोपाळपूरनगरी लाखो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमून गेली. आषाढी यात्रा सोहळ्याची काल्याने सांगता झाली. गोपाळपूर ग्रामपंचायतीने सर्व पालख्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.

उपजोनियां पुढती येऊं । काला खाऊं दही भात॥वैकुंठी तो ऐसें नाही। कवळ कांही काल्याचें॥ एकमेकां देऊ मुखी सुखी घालू हुंबरी॥ या संत वचनाप्रमाणे गोपाळ काल्याचा उत्सव झाला. पौर्णिमेच्या दिवशी परंपरेनुसार गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथे मानाची अंमळनेरकर महाराजांची पालखी काल्याच्या उत्सवासाठी पहाटे पाच वाजता भगवान श्रीकृष्ण मंदिरात दाखल झाली. त्यानंतर भजन झाले. पुढे पुढे चाला मुखाने श्री गजानन बोलाचा जयघोष करीत भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन झाले. पहाटेपासूनच एकामागोमाग एक अशा विविध संतांच्या छोट्या मोठ्या दिंड्या, पालख्या विठ्ठलनामाचा गजर करीत गोपाळपुरात दाखल होत होत्या.

सकाळी 9.20 च्या सुमारास जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांची तर 9.30 च्या सुमारास संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी सोहळे गोपाळपुरात दाखल झाले. या पालख्या दाखल होताच ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच शासकीय कर्मचारी
पालख्यांचे स्वागत केले.

श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या तसेच श्री तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. मंदिराजवळ पालख्या विसावल्या होत्या. या पालख्यासह संत सोपानकाका, संत मुक्ताबाई, संत नामदेव महाराज, संत गोरोबा, संत जनाबाई, संत एकनाथ महाराज, संत निवृत्ती महाराज यांच्यासह अन्य संतांच्या पालख्यांचे गोपाळपुरात आगमन झाले.

तत्पुर्वी गोपाळपुर येथील श्रीकृष्ण मंदीरात पहाटे दोन वाजता विश्वस्तांच्या हस्ते पूजा करण्यात आली. पूजा झाल्यानंतर पहाटे तीन वाजल्यापासून श्रीकृष्ण मंदीर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. भाविकांनी मोठ्या श्रध्देने श्री गोपाळकृष्णाचे दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घातली तसेच एकमेकांना प्रेमाने लाह्यांचा काला भरवून गळाभेट घेतली. श्रीकृष्ण मंदिर समितीच्या वतीने प्रसाद म्हणून लाह्यांच्या काल्याचे वाटप केले जात होते.

गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छ पिण्याचे पाणी, विद्युत व्यवस्था, हिरकणी कक्ष, प्लॅस्टिक संकलन केंद्र, तात्पुरते शौचालय आदी सुविधा वारकरी भाविकांसाठी उपलब्ध केल्या होत्या. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीनेही चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या सोहळ्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्यासह संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

गोपाळकाला झाल्यानंतर सर्व मानाच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात येऊन विठ्ठलाचे दर्शन घेऊन पालख्या आपापल्या परतीच्या मार्गावर रवाना झाल्या. तत्पूर्वी मंदीर समितीच्यावतीने मंदीर समितीचे सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ, संभाजी शिंदे, ॲड.माधवी निगडे, शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, कार्यकारी अधिकारी गजाननन गुरव यांनी पादुकांचे पुजन व मानाच्या पालख्यांचे मानकरी यांचे उपरणे,श्रीफळ व हार देवून सत्कार केला. यावेळी व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यासह मंदीर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close