अनिल सावंत यांना आमदारकी लाभावी;विठ्ठलाला दुग्धाभिषेक करून घातले साकडे
राष्ट्रवादीचाच होणार आमदार कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला...

संपादक – दिनेश खंडेलवाल
अनिल सावंत यांना आमदारकी लाभावी; विठ्ठलाला दुग्धाभिषेक करून घातले साकडे
राष्ट्रवादीचाच होणार आमदार कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला…
पंढरपूर(प्रतिनिधी):- सोलापूर जिल्हा पर्यायाने पंढरपूर मतदार संघ हा पूर्वीपासूनच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग असून गावं खेड्यापासून शहरापर्यंत गाव भेट दौऱ्याप्रसंगी सर्वांनीच तुतारी घेण्याचा आग्रह धरल्याने या मतदार संघात राष्ट्रवादीचाच आमदार होणार यात शंका नाही. तरीही अनिल सावंत यांचे समर्थक व कार्यकर्त्यांनी नामदेव पायरी समोर प्रति विठ्ठलाला दुग्धाभिषेक करून साकडे घातले असल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचून आमदार राष्ट्रवादीचाच होणार असल्याच्या घोषणा देण्यात आल्या.
सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लक्षवेधक ठरलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात तुतारीचा उमेदवार कोण असणार यावर उत्कंठा शिगेला पोहोचली होती. अखेर अगदी अंतिम टप्प्यात भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा एबी फॉर्म मिळवून तुतारीचे अधिकृत उमेदवार बनले आहेत. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात अगदी सुरुवातीपासूनच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेला अनिल सावंत यांच्यासारखा तगडा उमेदवार मिळाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये पर्यायाने संपूर्ण मतदारसंघात कार्यकर्त्यांचा उत्साह वाढल्याचे चित्र तयार झाले आहे.
पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य पदाधिकारी कार्यकर्ते यांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. तसेच महाविकास आघाडीतील मुख्य दोन घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह संचारला आहे. दोन्ही पक्षातील पदाधिकारी देखील अनिल सावंत यांच्या प्रचारात सहभागी होताना दिसत आहेत.
निवडणुका जाहीर होण्या अगोदर पासून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात इच्छुक असलेले माजी आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके, भैरवनाथ शुगरचे व्हा. चेअरमन अनिल सावंत हे मतदार संघातील गावं भेट दौऱ्याच्या निमित्ताने गावोगावी गेले त्यावेळी लोकांनी व तसेच इच्छुक असलेल्या सर्व नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा तुतारी या चिन्हावर निवडणूक लढविण्याचे आवाहन केले होते. याप्रमाणे सगळ्यांनीच प्रयत्न सुरू ठेवले होते. अनिल सावंत हे पहिल्यापासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. फक्त इच्छुक न राहता त्यांनी प्रयत्नही सुरू ठेवले होते.
साम दाम दंड भेद अशा सर्वच बाजूने सक्षम असलेले व तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले अनिल सावंत हे महायुतीचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना काटे की टक्कर देऊ शकतात अशी चर्चा सध्या मतदारसंघात होताना दिसत आहे.
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील तळागळा पर्यंत पोहोचून अनेकांना अडचणीच्या काळात मदत केल्यामुळे तसेच मतदारसंघातील नागरिकांची शरद पवार यांच्यावर असलेल्या निष्ठेमुळे अनिल सावंत यांना विजयाचा मार्ग सोपा व सुकर असल्याचे सध्यातरी चित्र दिसत आहे.