
संपादक – दिनेश खंडेलवाल
कासेगाव अनवली टाकळी ग्रामस्थ आक्रमक बायपास रस्त्याच्या खड्ड्यात केले वृक्षारोपण
नॅशनल हायवेची जड वाहतूक एमडीआर रस्त्यावर नको नॅशनल हायवेला जोडावी – परिचारक
पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर शहरातून टाकळी मार्गे कासेगाव अनवली कडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावर जड वाहतुकीमुळे मोठमोठे खड्डे पडल्याने या मार्गावरून वाहतूक करणे जीकीरीचे झाल्याने व संयम सुटल्यामुळे आज अखेर तिन गांवच्या नागरिकांनी एकत्र येत रस्त्यातील खड्ड्यावर वृक्षारोपण करत रास्ता रोको आंदोलन केले. सदर आंदोलनात आमदार समाधान आवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक हेही उपस्थित होते. सदरचा रस्ता हा एमडीआरचा असून या रस्त्यावर नॅशनल हायवे ची जड वाहतूक आणू नका ती नॅशनल हायवेला जोडावी अशी मागणी माजी आमदार प्रशांत परिचारक व ग्रामस्थातून करण्यात आली.
सदरचा बायपास हा वाखरी टाकळी कासेगाव अनवली असा जोड रस्ता आहे. हा रस्ता एमडीआर असून नॅशनल हायवे कडे नसल्यामुळे शासनाच्या निधीमधून हा रस्ता आत्तापर्यंत केला जात होता. याकरता जवळजवळ दहा ते अकरा कोटीचा निधी मंजूर झाला, टेंडर झाले परंतु ठेकेदाराच्या चुकी व दिरंगाई मुळे हे काम रखडले. दरम्यान अतिवृष्टी व जड वाहतुकीमुळे रस्ता खूपच खराब झाला. या रस्त्याच्या दुरुस्ती बाबत नागरिकांनी बांधकाम विभागाला अनेक वेळा मागणी करूनही काम होत नसल्याने अखेर जनतेचा संयम सुटला सहनशीलता संपली त्यामुळे कासेगाव चौथामैल या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आले.
सदरचा रस्ता नॅशनल हायवे कडे दिल्यास रस्ता चांगल्या प्रकारचा होईल सध्या नॅशनल हायवे वरून या रस्त्यावर रहदारी होत असल्याने जड वाहतुकीमुळे त्रास सहन करावा लागत आहे. परंतु सदर रस्त्याला पर्यायी रस्ता उपलब्ध नाही. विजापूर पंढरपूर नगर कडे जाण्यासाठी रस्ता नाही. सदरची वाहतूक सांगोला मार्गे वळवून वेणेगाव मंद्रूप मोहोळ अशी करण्यात यावी ही मागणी केली असल्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले. यामुळे वाहनधारक व नागरिकांचा फायदाच होणार आहे. तसेच सदरच्या रस्त्याला अधिकचा निधी देऊन रस्ता बनवून जडवाहतूक बंद करण्याबाबत मार्ग काढू, रस्ता पूर्णपणे तयार झाल्यानंतर नॅशनल हायवे कडे वर्ग करू अशी मागणी ही बांधकाम मंत्र्यांकडे केली असल्याचे परिचारक त्यांनी सांगितले.
सदरचा रस्ता दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे अनेक वेळा मागणी करूनही अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष केले जड वाहतुकीमुळे अनेकांचे बळी गेले अनेक वेळा जड वाहने पलटी होण्याचे प्रकार घडले तरीही बांधकाम खात्याला जाग येत नाही याबाबत उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त करत रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण केले.