अपघाताला आमंत्रण देणारे खड्डे पावसाळ्यात बनले धोकादायक!!
टाकळी ग्रामपंचायत चा निष्काळजीपणा; सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ!
संपादक-दिनेश खंडेलवाल
अपघाताला आमंत्रण देणारे खड्डे पावसाळ्यात बनले धोकादायक!!
टाकळी ग्रामपंचायत चा निष्काळजीपणा; सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ!
पंढरपूर :- पंढरपूर शहराच्या उपनगराला जोडून असलेल्या लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत चा निष्काळजीपणा बनतोय सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ असा प्रश्न उपनगरातील नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत येथील जगदंबा नगर परिसरात रस्त्याच्या कडेला ग्रामपंचायत गेल्या आठ दिवसांपासून चार मोठे खड्डे करून ठेवले असून हे खड्डे अपघाताला तर आमंत्रण देतातच परंतु रोहिणी आणि मृग नक्षत्राच्या दमदार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचत असल्याने हे खड्डे दिसून येत नाहीत आणि याच खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपघाताला आमंत्रण देणारे खड्डे पावसाळ्यात धोकादायक बनले आहेत.
या परिसरातील रहिवाशांना ग्रामपंचायतीकडून दिल्या जाणाऱ्या पाण्यामध्ये क्षार अडकल्याने क्षार काढण्यासाठी तीन ते चार खड्डे जेसीबीने सुमारे तीन ते चार फूट खोलीचे बनवण्यात आले आहेत. परंतु ते पुन्हा बुजवले नसल्याने गेल्या आठ दिवसापासून जगदंबा नगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना एखादे वाहन जर खड्ड्याच्या शेजारी असेल तर दुचाकी पुढे नेण्यासाठी वाहन निघण्याची वाट पाहावी लागते याबाबत ग्रामसेवकाकडे तोंडी तक्रार केली असता त्यांनी थातूरमातूर आणि उडवाउडवीची उत्तरे देत खड्डे बुजवण्यास टाळाटाळ करत वेळ काढू पणा करत असल्याचे दिसते.
या ठिकाणाहून एखादा रहिवासी अथवा बाहेरील कोणी वाहनधारक जर रस्त्यावरून जाताना अपघात होऊन निरपराध नागरिकांचा बळी जाण्याची वाट ग्रामपंचायत पाहत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
[ जगदंबा नगर मधील धोकादायक बनलेले खड्डे ग्रामसेवकाने व ग्रामपंचायतीने त्वरित बुजवावे या खड्ड्यांचे गांभीर्य ग्रामपंचायतीने ओळखून त्वरित निर्णय घेऊन उपाययोजना करावी व सर्वसामान्य नागरिकांना सुलभ वाहतूक होण्यासाठी रस्ता खुला करणे आवश्यक आहे. या ठिकाणी अपघाताची घटना होऊन एखाद्या निरपराध व्यक्तीच्या जीवितास बरे वाईट झाल्यास अथवा दुर्घटना घडल्यास सर्व प्रकारच्या नुकसानाची जबाबदारी टाकळी ग्रामपंचायतची तसेच ग्रामसेवकाची असेल.सामाजिक कार्यकर्त्या कविता धोत्रे-राजमाने ]