संपादक – दिनेश खंडेलवाल
पंढरपूर नजिक लक्झरी बसची ट्रकला समोरासमोर जोरात धडक
भीषण अपघातात २ जागीच मयत;३४ प्रवासी जखमी
जखमी मध्ये लोणावळा, पुणे,चाकण, खेड, बीड येथील प्रवासी होते
पंढरपूर(प्रतिनिधी):- सकाळी साडेसहाच्या सुमारास पंढरपूर नजिक भटुंबरे हद्दीतील खेडलेकर मठा जवळ पुणे येथून देवदर्शनाला निघालेल्या खाजगी लक्झरी ट्रॅव्हल बसची आणि मालट्रकची समोरासमोर जोरात धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात ३४ जण गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी अति गंभीर असलेल्या चालकासह १२ रुग्णांना सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी तातडीने हलवण्यात आले.
तर उर्वरित रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सदर अपघातग्रस्त बस मध्ये लोणावळा, चाकण, पुणे,खेड, बीड वाडेगाव येथील प्रवासी होते. यामध्ये एकूण ३४ प्रवासी जखमी झाले हा अपघात इतका भीषण होता की ट्रॅव्हल्सच्या पुढच्या बाजूचा पत्रा पूर्णपणे निघून गेला. यावेळी बसमधील प्रवाशांनी मोठ्या आवाजात आरडाओरडा केला त्यामुळे परिसरातील नागरिक धावत घटनास्थळी पोहोचले व त्यांनी प्रवाशांना वाचवण्याचे अथक प्रयत्न सुरू केले. यावेळी बेबाबाई सोपान महालस्कर (वय ५५) व जानवी महालस्कर (वय ७) वर्ष दोन प्रवासी जागीच मयत झाले. चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यासह इतर जखमी प्रवाशांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले.
टेंभुर्णी कडून पंढरपूरकडे येत असलेली लक्झरी ट्रॅव्हल बस क्रमांक एम.एच. १४/ एल.एस. ३९५५ चा पंढरपूर कडून टेंभुर्णीकडे निघालेल्या मालवाहतूक ट्रक क्रमांक आर जे १४/ जी एल १७८० सोबत समोरासमोर भिषण धडक होऊन अपघात झाला या अपघातात बस आणि मालवाहतूक ट्रकचा समोरच्या भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघात झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर, पोलीस उपनिरीक्षक भोसले,व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक नागरिकांचे मदतीने दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.
डॉक्टरांची तत्परता रुग्णांवर तातडीने उपचार.. उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथील सर्व डॉक्टर स्टाफ तसेच कर्मचारी यांनी सदर अपघाताची माहिती समजतात रुग्णालयात हजर राहून जखमी प्रवासी रुग्णांवर तातडीने अथक उपचार करत कर्तव्यदक्षता दाखवून दिली अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सुडके यांनी दिली.