सोलापूर जिल्ह्यात वाळू माफियांचं राज्य चालू देणार नाही – पालकमंत्री गोरे
विठुरायाच्या नगरीचा लवकरच कायापालट होणार;आराखडा अंतिम टप्प्यात - मंत्री जयकुमार गोरे

संपादक – दिनेश खंडेलवाल
सोलापूर जिल्ह्यात वाळू माफियांचं राज्य चालू देणार नाही – पालकमंत्री जयकुमार गोरे
विठुरायाच्या नगरीचा लवकरच कायापालट होणार;आराखडा अंतिम टप्प्यात – मंत्री जयकुमार गोरे
पंढरपूर(प्रतिनिधी):- अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या नगरीचा लवकरच कायापालट होणार असून त्याचा आराखडा अंतिम टप्प्यात आहे. तर सोलापूर जिल्ह्यात कोणत्याही वाळू माफियांचं राज्य चालू देणार नाही. यावर योग्य ती कारवाई केली जाणार असून राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात काम करत असताना वाळू माफियांच राज्य संपून जाईल हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल अशी प्रतिक्रिया सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विठ्ठलाच्या दर्शनानंतर माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केली.
याप्रसंगी आमदार समाधान आवताडे, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार राम सातपुते, चेतनसिंह केदार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की पंढरपूरच्या विकासाचे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न आहे. लवकरच आपल्याला चांगल्या पद्धतीचा विकास या ठिकाणी होताना दिसणार आहे. तीर्थक्षेत्र पंढरपूरात येणाऱ्या लाखो भाविक व नागरिकांची चांगल्या प्रकारे सोयी सुविधा व्हावी, या ठिकाणी स्वच्छता दिसावी तसेच या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत व्हावे यासाठी मुख्यमंत्री महोदय लवकरच निर्णय घेणार असून येणाऱ्या काही दिवसात याची प्रचिती येईल असेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच जयकुमार गोरे यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी आले. दर्शनानंतर पहिली प्रतिक्रिया देताना ते म्हणाले
आज विठ्ठलाचे दर्शन घेऊन मी धन्य झालो आहे. राज्याच्या जनतेची सेवा करण्याची ताकद मिळावी, सामान्य माणसांना तसेच शेतकरी व युवा वर्गाला अपेक्षित आहे त्या पद्धतीचे कार्य आपल्या हातून करण्याची विठुरायाने शक्ती द्यावी असे साकडे आपण विठ्ठलाला घातले आहे. मला खात्री आहे जी जबाबदारी पक्ष व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर टाकली ती पूर्ण होईल. माळशिरस, पंढरपूर येथील जनतेने उत्स्फूर्त स्वागत केले आहे. विठुरायाच्या, सिद्धनाथाच्या, स्वामींच्या नगरीची सेवा करण्यासाठी माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळते याचा आनंद व अभिमान आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या प्रश्नासंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक घेणार आहे. यावेळी बेकायदेशीर सुरू असलेल्या कामांवर आळा बसण्यासाठी योग्य ती कारवाई करण्यासाठी सूचना देण्यात येतील त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात कोणतेही बेकायदेशीर कामे चालू दिले जाणार नाही. कायदा व सुव्यवस्था राखली जाईल, सर्व सामान्य जनतेला न्याय मिळेल. या ठिकाणच्या कोणत्याही अधिकारी व जनतेला त्रास होणार नाही त्यामुळे माफिया राज्य संपून जाईल, राज्याचे मुख्यमंत्री व जनतेला अपेक्षित असलेली कामे या ठिकाणी होतील असा विश्वास सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शेवटी व्यक्त केला.