
संपादक – दिनेश खंडेलवाल
देवेंद्र फडणवीस हे कृतिशील बांधिलकी आणि लोककल्याणाचे दृष्टिकोन असणारे व्यक्तिमत्व- आ. समाधान आवताडे
मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विक्रमी रक्तदान व ५५,५५५ वृक्ष लागवड संकल्प
पंढरपूर(प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने विधानसभा मतदारसंघांमध्ये भव्य महारक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेण्यात आले. पर्यावरण रक्षण आणि सामाजिक भान जपत या दोन्ही उपक्रमांना मतदारसंघातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पंढरपूर येथे आ समाधान आवताडे यांनी श्री भगवंत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची आरती करुन तुळशी पूजन केली. त्याचबरोबर माचणूर येथील श्री सिद्धेश्वर हुलजंती येथील श्री महालिंगराया, हुन्नूर येथील श्री बिरोबा लक्ष्मीदहिवडी येथील लक्ष्मीदेवी मंगळवेढा शहर येथे दामाजी पंत व संत चोखामेळा यांना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी देव अभिषेक करुन दीर्घायुष्य साठी प्रार्थना करण्यात आली. संपन्न झालेल्या समाजातील गरजुंना नवजीवन देणाऱ्या या रक्तदान रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मंगळवेढा तालुक्यातील बोराळे, हुलजंती, शिरनांदगी, लक्ष्मी दहिवडी येथे तर पंढरपूर तालुक्यात गादेगांव, लक्ष्मी टाकळी, तावशी व अनवली या ठिकाणी ७८४ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली आहे.
त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात ५५,५५५ वृक्ष लागवड व संवर्धन करण्याचा संकल्प केला आहे. या वृक्षारोपण व संवर्धन संकल्पाचा शुभारंभ मंगळवेढा शहरातील इंग्लिश स्कूल येथे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुजित कदम यांच्या नियोजनातून आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते छोटेसे रोपटे लावून करण्यात आला. यावेळी उपस्थित राहून ग्रामस्थांना वृक्ष लागवड व संवर्धनाचे महत्त्व आ. आवताडे यांनी यावेळी समजावून सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोरगरिबांच्या सेवेसाठी आणि सकल राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी व विधायक प्रगतीसाठी केलेली कृतिशील बांधिलकी आणि त्यांचा लोककल्याणाचा दृष्टिकोन याला समर्पित भावनेतून ही दोन्ही शिबिरे आयोजित करण्यात आले होती असे प्रतिपादन आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले आहे.
याप्रसंगी तहसीलदार मदन जाधव, तालुका कृषी अधिकारी मनिषा मिसाळ -जाधव, सामाजिक वनीकरण च्या शितल चाटे तसेच विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सर्व मंडल अध्यक्ष यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दोन्ही उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.