संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : कुंकू, बुक्क्यासह लाह्यांची मुक्त उधळण करीत महाव्दार काला मोठ्या उत्साहातl
साजरा करण्यात आला. या उत्सवा नंतर खर्या अर्थाने आषाढी यात्रेची सांगता झाल्याचे मानले जाते.
संत नामदेव महाराज व संत पांडुरंग महाराज यांचे वंशज नामदास व हरिदास घराण्याच्या वतीने महाव्दार काल्याचा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. श्री विठ्ठलाचे सेवाधारी असलेल्या पांडुरंग महाराज यांना चारशे वर्षापूर्वी प्रत्यक्ष पांडुरंगाने प्रसादरूपी आपल्या खडावा दिल्याची अख्यायिका आहे. त्यानुसार हरिदास घराण्यातील अकरा पिढ्यापासून महाव्दार काला साजरा केला जातो.
गुरूवारी परंपरे नुसार हरिदास यांच्या काल्याच्या वाड्यात दुपारी अकरा वाजता संत नामदेव महाराजांचे वंशज दिंडी घेवून दाखल झाले. यावेळी आरती होवून शंभर फगटी पागोट्याने देवाच्या खडावा काल्याचे विद्यमान मानकरी मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर बांधण्यात आल्या. हा सोहळा श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील सभामंडप येथे दाखल झाला. येथे पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर काल्याचा अभंग म्हणून दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी हा प्रसाद ग्रहण केला.
यानंतर हा सोहळा महाव्दार घाट येथून चंद्रभागा नदी, कुंभार घाटावरून माहेश्वरी धर्मशाळा,आराध्ये गल्ली मार्गे हरिदास वेस व काल्याच्या वाड्यात दाखल झाला.
यावेळी रस्त्यावर हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. जागोजागी कुंकू, बुक्का, लाह्याची उधळण केली जात होती. उपस्थित हजारो वारकर्यांना उत्सवा नंतर दही, लाह्यापासून बनविलेल्या काल्याचे वाटप करण्यात आले.
गोपाळपूरच्या काल्यानंतर महाव्दार काला होताच आषाढी वारीची सांगता झाल्याचे मानले जाते.