
संपादक – दिनेश खंडेलवाल
मेहतर समाजाच्या २१३ कुटुंबीयांना सदनिका मिळणार – आ.आवताडे
६०० चौ.फूट असणार सदनिका;निधीची कमतरता भासणार नाही
पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर शहरात वारीच्या निमित्ताने लाखो भाविक दरवर्षी येतात. या भाविकांचे तसेच तेथील रहिवाशांचे आरोग्य चांगले राहावे, या हेतूने १८८९ साली मेहतर समाज पंढरपुरात साफसफाईसाठी आणला गेला. या मेहतर समाजातील २१३ लोकांच्या कुटुंबीयांसाठी सदनिकांचे बांधकाम करण्याचा प्रस्ताव होता. हा प्रस्ताव उच्च न्यायालयाच्या समितीकडून आयुक्तांकडे गेला होता आणि आयुक्त समितीने त्याला मंजुरी देऊन शासनाकडे पाठवला. मात्र तो प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
१८८९ सालापासून पंढरपूरच्या स्वच्छतेत मेहतर समाजाचे योगदान आहे. जे आजही अविरतपणे कार्यरत आहेत. या मेहतर समाजाच्या सदनिकांच्या प्रश्नांची सोडवणूक विहित वेळेत होणार का? आणि किती दिवसात या प्रश्नाची सोडवणूक होऊन या २१३ कुटुंबियांना सदनिका बांधून मिळणार? महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात यासंबंधी प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे व मंत्री महोदयांचे लक्ष वेधले.
या अनुषंगाने, सकारात्मक प्रतिसाद देत, वित्त व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुधारित पंढरपूर तीर्थक्षेत्र आराखड्यामध्ये या प्रकल्पाचा समावेश केला असून या आराखड्यात एकूण १३ इमारती उभारण्यात येणार असून, त्यापैकी १२ इमारती ४ मजली, तर १ इमारत ५ मजली असेल. यामधील ७ इमारतींमध्ये एकूण २४ गाळे काढण्यात येणार आहेत.
यासोबतच, विधीमंडळाचे कामकाज संपल्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण आराखड्यातील हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी चर्चा केली जाईल असे स्पष्ट केले.