दिवाळीपूर्वी घरकुल प्रकल्पाचे काम सुरू न केल्यास मनसे घेणार घरांचा ताबा
तीस वर्षाच्या कराराची अट प्रशासनाने केली रद्द
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : पंढरपूर येथील नगर परिषदेच्या अंतर्गत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांच्या विविध प्रश्नांबाबत मनसे नेते दिलीबापू धोत्रे यांनी गुरुवारी पंढरपूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या दालनामध्ये उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, नगरपालिका बांधकाम अभियंता नेताजी पवार यांच्याबरोबर विविध प्रश्नांबाबत चर्चा केली .
यावेळी घरकुल लाभार्थ्यांना लवकरात लवकर घर मिळावे तसेच घर घेण्यासाठी येणाऱ्या विविध अडचणी नगरपालिका प्रशासनाकडे मांडल्या.
यामध्ये ३० वर्षाच्या करारावरच घर देण्याची अट घातल्याने लाभार्थ्यांना बँकांकडून कर्ज मिळत नव्हते.
मनसेच्या वतीने सदरची अट रद्द करण्याची मागणी नगरपालिका प्रशासनाकडे केली होती.
याबाबत नगरपालिका प्रशासनाने सदरची अट रद्द केल्याने मनसेच्या मागणीला यश आले असून पंढरपूर शहरातील पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरासाठी बँकेचे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच अनेक दिवसांपासून बंद असलेला पंढरपूर शहरातील घरकुल प्रकल्प ताबडतोब चालू करावा अन्यथा येत्या दिवाळीत घरांचा ताबा घेण्यात येईल असा इशारा मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी नगरपालिका प्रशासनाला दिला आहे.
याबाबत पंढरपूर नगरपालिका प्रशासनाने लवकरच घरकुल प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येईल असे पत्र मनसे नेते दिलीप धोत्रे यांना दिले.
यावेळी कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अरुणभाऊ कोळी, संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण राज घाडगे ,मनसेचे पंढरपूर शहराध्यक्ष संतोष कवडे ,तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, मनसेचे उपशहर अध्यक्ष गणेश पिंपळनेरकर, विवेक बेणारे सर्व लाभार्थी बांधव उपस्थित होते.