शरद पवारांची नीती मोहोळ मधून रमेश कदमांची कन्या सिद्धी कदम मैदानात
राजू खरे,क्षीरसागर, ढोबळे यांना कलाटणी;मोहोळ मध्ये बंडखोरी अटळ
संपादक – दिनेश खंडेलवाल
शरद पवारांची नीती मोहोळ मधून रमेश कदमांची कन्या सिद्धी कदम मैदानात
राजू खरे,क्षीरसागर, ढोबळे यांना कलाटणी;मोहोळ मध्ये बंडखोरी अटळ
पंढरपूर(प्रतिनिधी):- २४७ मोहोळ (अ.जा.) विधानसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडी कडून पाच जणांनी उमेदवारी मागितली होती. परंतु यामध्ये आपली उमेदवारी फिक्स म्हणणारे सुद्धा बाजूला ठेवून शरदचंद्र पवार यांनी आपल्या अनेक वर्षाच्या अभ्यासातून राजकीय नीती द्वारे नवा चेहरा समोर आणून या मतदारसंघात सर्वांनाच धक्का दिला आहे.
मोहोळ मतदारसंघात शरद पवारांनी मोहोळ चे माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांना विधानसभेच्या रणांगणात उतरवून अजित पवार गटाकडून उभे असलेले विद्यमान आमदार यशवंत माने यांच्याविरुद्ध शरद पवार गटातून सोलापूर जिल्ह्यातून सर्वात तरुण असणाऱ्या महिला वर्गाला उमेदवारी देऊन या मतदारसंघाची निवडणूक “काटे की टक्कर” अशी केली आहे.
मोहोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये पंढरपूर तालुक्यातील सतरा गावांचा समावेश असल्याने या सतरा गावांच्या मतांची किमया या मतदारसंघावर दिसून येणारी असल्याने पंढरपूर तालुक्याचे ह लक्ष या मतदारसंघाकडे होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर झाली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ९ उमेदवारांच्या नावांची नुकतीच घोषणा केली आहे. जाहीर केलेल्या यादीत सर्वात शेवट सिद्धी कदम मोहोळ ची उमेदवार असल्याचे जाहीर केल्याने मतदार संघात रमेश कदम यांच्या कार्यकर्त्यातून जल्लोष व उत्साह दिसून येत आहे. या मतदारसंघात माजी आमदार रमेश कदम यांच्या नावाची चर्चा होती. पण शरद पवार गटाने रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी दिली आहे.
मोहोळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळालेल्या सिद्धी कदम या माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या आहेत. रमेश कदम हे अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ घोटल्याप्रकरणी तुरुंगात होते. त्यांच्या इमेजचा फटका बसू नये म्हणून सिद्धी कदम यांना उमेदवारी दिल्याची चर्चा मतदार संघात सुरु आहे. त्यावेळी अपक्ष असलेल्या रमेश कदम यांना २५ हजार मते मिळाली होती. रमेश कदम यांच्यावर असलेला ठपका पाहता शरद पवार गटाने सिद्धी कदमला संधी दिल्याचे दिसत आहे. रमेश कदम जामिनावर बाहेर आहेत. त्यांचा आगामी काळात जामीन रद्द झाला तर अडचण येऊ शकते, म्हणून सिद्धी कदम पर्याय निवडण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
[अनुभवी सिद्धी कदम कारकीर्द——–
सिद्धी कदम या माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या आहेत. सिद्धी कदम यांचे शिक्षण टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्समधून झालं आहे. त्या एका एनजीओ मध्ये देखील काम करतात. २०१९ च्या निवडणुकीत वडील तुरुंगात असताना त्यांनीच प्रचार यंत्रणा सांभाळली होती. आतापर्यंत जाहीर झालेल्या सोलापुर जिल्ह्यातील उमेदवारापैकी सर्वात तरुण उमेदवार आहेत, त्यांचे वय २६ वर्षे आहे.]
[ मोहोळमध्ये बंडखोरी अटळ…….
मोहोळ विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून पाच इच्छुक उमेदवार आघाडीवर होते. त्यामध्ये प्रामुख्यानं संजय क्षीरसागर, राजू खरे तसेच लक्ष्मण ढोबळे यांच्यासह त्यांचे पुत्र अभिजीत ढोबळे, त्यांची कन्या कोमल ढोबळे हे देखील इच्छुक होते. मात्र अशातच सिद्धी कदम यांचे नाव अनपेक्षित पणे जाहीर केल्याने मोहोळ मतदारसंघात बंडखोरी अटळ असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मोहोळच्या उमेदवारीसाठी क्षीरसागर व राजू खरे यांनी मतदार संघात अनेक विकास कामे करत निधी आणला जनतेपर्यंत पोहोचले त्यांच्या या कामावर उमेदवारी मिळण्याची शक्यता प्रबल असताना सिद्धी कदम यांचे नाव जाहीर झाल्याने या मतदारसंघात बहुरंगी लढत पाहायला मिळणार अशी चर्चा आता मोहोळच्या चौकात होऊ लागली आहे.]
जयंत पाटील यांनी जाहीर केलेली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारांची तिसरी यादी पुढील प्रमाणे
कारंजा- ज्ञायक पाटणी,
हिंगणघाट- अतुल वामदिले
नागपूर हिंगणा- रमेश बंग
अणुशक्तीनगर- फहाद अहमद
चिंचवड- राहुल कलाट
भोसरी- अजित गव्हाणे
बीड माजलगाव- मोहन बाजीराव जगताप
परळी- राजेश देशमुख
मोहोळ- सिद्धी रमेश कदम