
संपादक – दिनेश खंडेलवाल
पंढरपुरातील नाट्य रसिकांसाठी संत कान्होपात्रा नाट्यप्रयोग सर्वांसाठी खुला प्रवेश
बालगंधर्वांनी १९३३ साली रंगभूमीवर आणलेले नाटक पंढरपुरात ७ सप्टेंबर रोजी सादरीकरण
पंढरपूर(प्रतिनिधी):- नटसम्राट बालगंधर्वांनी लोकप्रिय केलेल्या व विठ्ठल भक्ती वर आधारित संत कान्होपात्रा या संगीत नाटकाचा प्रयोग पंढरपूर शहरात रविवार दि. ७ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
पुण्याच्या बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे आरती मंडप प्रांगणात सायंकाळी ५ वाजता सादर केला जाणारा हा प्रयोग रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य खुला ठेवण्यात आला आहे.
संत चोखामेळा व संत कान्होपात्रा यांच्या विठ्ठलावरील एकनिष्ठ भक्तीचे दर्शन घडविणारे हे नाटक बालगंधर्वांनी १९३३ साली रंगभूमीवर आणले होते. संत ज्ञानेश्वर, चोखामेळा, कान्होपात्रा यांच्या अभंगाची यात रेलचेल असून शहरी व ग्रामीण अशा दोन्ही विभागांमध्ये पसंतीस उतरलेले नाटक असा याचा परिचय आहे.
या नाटकात चोखोबाची भूमिका सूरगंधर्व सुरेश साखवळकर हे साकारणार असून सौ. अस्मिता चिंचाळकर या कान्होपात्रेची भूमिका करणार आहेत. त्या शिवाय बालगंधर्वांच्या नातसून सौ. अनुराधा राजहंस, रवींद्र कुलकर्णी, सौ. श्रद्धा सबनीस मालिकाफेम चिन्मय पाटसकर, अवंती बायस, निरंजन कुलकर्णी, विवेक काटकर व अजित भालेराव हे अन्य भूमिका साकारणार आहेत. या कलाकारांना ऑर्गनवर हर्षल काटदरे, तबल्यावर प्रशांत पांडव व्हायोलिनवर प्रमोद जांभेकर तर पखवाजवर प्रसाद भांडवलकर साथ संगत करणार आहेत.
पंढरपूरमध्ये सादर होत असलेल्या या नाट्यप्रयोगाचा लाभ रसिकांनी,भाविक भक्तांनी अवश्य घ्यावा असे आवाहन माजी आ. प्रशांत परिचारक,पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे मुख्याधिकारी उमेश विरदे व मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष किरण जोशी यांनी केले आहे.