पालखी मार्गाची कामे 20 जूनपर्यंत पूर्ण करा- विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या सूचना
65 एकर परिसर स्वच्छ व जंतुनाशक फवारणी करा
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : श्री.संत ज्ञानेश्वर व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाह अन्य संताच्या पायी दिंडी पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक चालत येतात. पायी पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये. यासाठी पालखी मार्गावरील कामे 20 जूनपर्यंत पूर्ण करावीत. तसेच पायाला मुरुम ,दगड लागणार नाहीत याची दक्षता घेवून या मार्गावरील स्वच्छता करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या.
शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे आषाढी वारी पूर्वतयारी नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, प्रांताधिकारी गजानन गुरव, आप्पासाहेब समिंदर, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त अभय टिळक, पालखी सोहळा प्रमुख ॲड.विश्वास ढगे, सोपान महाराज पालखी सोहळा प्रमख त्रिगुण गोसावी यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री. राव म्हणाले, पालखी मार्गावर तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी भाविकांना पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता यासह आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत नियोजन करावे. आषाढी यात्रा कालावधीत मोठ्या प्रमाणात वारकरी-भाविक पंढरपूरात येतात. नगरपालिकेने यात्रा कालावधीत स्थानिक लोकसंख्या तसेच येणाऱ्या भाविकांची संख्या विचारात घेवून मुबलक प्रमाणात पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी. तसेच शहरातील नगरपालिकेच्या बोअरवेलसह खाजगी बोअरवेलव्दारे पाणीपुरवठा करावा. आवश्यकतेनुसार इतर जिल्ह्यातून टॅंकरची मागणी करावी. यात्रा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तत्काळ मंदीर परिसर, नदी पात्र, 65 एकर येथील स्वच्छता करावी. या कालावधीत पावसाळा असल्याने साथीचे आजार पसरण्याची शक्यता असल्याने तत्काळ स्वच्छता व जंतनाशक फवारणी करावी.
यात्रा कालावधीत मास्क वापरणे बंधनकारक नसले तरीही नागरिकांनी आरोग्य सुरक्षिततेसाठी मास्कचा वापर करावा, मंदीर समितीने भाविकांना मास्कचे वाटप करण्याबाबत नियोजन करावे. अशा सूचना श्री राव यांनी दिल्या.
श्री राव यांनी 65 एकर, चंद्रभागा नदी पात्र, श्री.विठ्ठल-रुक्मिणी मंदीर, संत सोपान महाराज पालखी तळ तसेच चांगावटेश्वर, चौरंगीनाथ महाराज तसेच संत सोपान महाराज पालखी सोहळ्यासाठी आवश्यक असणाऱ्या नियोजित जागेची पाहणी करुन आवश्यक त्या सूचना संबधिताना दिल्या.
भाविकांना मुबलक प्रमाणात स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी ठिकठिकाणी नळ जोडणी, टँकरची व्यवस्था करावी, नगरपालिकेमार्फत उभारण्यात येणाऱ्या तात्पुरत्या शौचालयाची वेळोवेळी स्वच्छता करावी तसेच तेथे मुबलक पाणी उपलब्ध करावे, अशा सूचना श्री आवताडे यांनी दिल्या.
जिल्ह्यातील पालखी मार्गाचे 90 टक्के काम पूर्ण झाले असून, पालखी मार्गावर तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात आले असून भाविकांना स्वच्छ, पिण्याचे पाणी, आरोग्य व्यवस्था स्वच्छता याबाबत नियोजन करण्यात आले आहे. पालखी सोहळा जिल्ह्यात दाखल होण्यापुर्वी वारकऱ्या सोयी सुविधांची सर्व कामे पूर्ण करण्यात येतील असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.
यावेळी प्रांताधिकारी गुरव यांनी पंढरीची वारी मोबाईल ॲपबद्दल माहिती दिली. या ॲपमध्ये पालखी मार्गक्रमण, विसावा व मुक्कामचे ठिकाण, पालखी सोहळ्याचे प्रमुख, वैद्यकीय सेवा, टँकर, गॅसची टाकी मिळण्याचे ठिकाण, रुग्णवाहिका, अग्निशमन, लाईव्ह पंढरपूर दर्शन आदी महत्वाची माहिती पुरविण्यात येणार आहे.
यावेळी मुख्याधिकारी अरविद माळी यांनी नगरपालिकेमार्फत करण्यात आलेल्या पाणीपुरवठा, स्वच्छता, तात्पुरती शौचालय, आदिंची माहिती दिली.