
संपादक – दिनेश खंडेलवाल
पंढरीच्या रस्त्यावर खड्ड्यांची मांदियाळी
रस्त्यावरील खड्ड्यातून जाताना वाहनधारक त्रस्त प्रशासन सुस्त
पंढरपूर(प्रतिनिधी):- अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तीर्थक्षेत्र पंढरपूर मध्ये नुकतीच आषाढी यात्रा संपन्न होऊन दोन महिने होत नाही तोपर्यंत आषाढी यात्रेत प्रशासनाने शहराच्या विविध भागांमधील रस्ते दुरुस्ती दर्जेदार पद्धतीची करून घेतली होती. अनेक ठिकाणी नव्याने रस्त्याचे टेंडर काढण्यात आले परंतु या सर्व रस्त्यावर सध्या खड्ड्यांची मांदियाळी दिसून येऊ लागली आहे.
पंढरपूर शहराच्या स्टेशन रोड, छत्रपती शिवाजी महाराज सर्कल, सावरकर चौक ते इंदिरा गांधी चौकाकडे जाणारा रस्ता, सरगम चौक ते कॉलेज चौका कडे जाणारा रस्ता, सरगम चौक ते अहिल्या पुलाकडे जाणारा रस्ता या सर्व रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने खड्ड्यात रस्ता कि रस्त्यावर खड्डे असे दृश्य पाहायला मिळत आहे.
सध्या सुरू असलेल्या पावसामुळे अशा खड्ड्यांमधून तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने पाण्यामध्ये रस्ते दिसत नाहीत. अनेक वेळा वाहनधारकांना या मार्गातून जाताना कसरत करावी लागते. पंढरपूरातील प्रशासन सध्या सुस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. दोन महिने होत नाही तोपर्यंत दर्जेदार रस्ते हे निकृष्ट झाल्याचे पुरावेच या खड्ड्यांनी दिले असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील तसेच बाहेर गावाहून पंढरपुरात आलेले वाहनधारक व उपनगरातील नागरिकांना मात्र अशा खड्ड्यातून वाहन चालवताना त्रस्त होताना दिसत असल्याचेही पहावयास मिळते. परंतु तीर्थक्षेत्र पंढरपूरात दर्जेदार रस्त्यासाठी आलेला निधी वापरला गेला. परंतु रस्ते दर्जेदार नसून निकृष्ट असल्याचे सध्या सर्व जनतेला पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यामुळे पंढरपूर मध्ये खड्ड्यांची मांदियाळी निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वेळेत प्रशासनाने अशा घटनेकडे लक्ष देऊन ज्या ठेकेदारांनी हे रस्ते बनवले आहेत त्या ठेकेदाराकडून पुन्हा नव्याने रस्ते दुरुस्त करून घ्यावेत अशी मागणी नागरिकांतून होताना दिसते. चेहऱ्याच्या रस्त्याप्रमाणेच उपनगरातील रस्त्यांची हीच अवस्था आहे. प्रशासनाने खड्डे बुजवून रहदारीसाठी चांगला रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.