पंढरीत बुद्धभूमी जागेसाठी नगरपरिषदे समोर हलगीनाद आंदोलन, उपोषण करणार – सिद्धार्थ जाधव
मंदिर समिती कर्मचाऱ्यांना जागा देण्यासाठी प्रशासनाच्या हालचालीला विरोध

संपादक – दिनेश खंडेलवाल
पंढरीत बुद्धभूमी जागेसाठी नगरपरिषदे समोर हलगीनाद आंदोलन, उपोषण करणार – सिद्धार्थ जाधव
मंदिर समिती कर्मचाऱ्यांना जागा देण्यासाठी प्रशासनाच्या हालचालीला विरोध
पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर नगरपरिषदेने सुमारे बारा वर्षांपासून लोकशाही मार्गाने सनदशीर प्रस्तावित केलेल्या बुद्धभूमीसाठी आवश्यक असलेली जमीन देण्यास प्रस्थापित नोकरशाही टाळाटाळ करीत आहेत. मात्र अधिकाऱ्यांच्या संगनमताने कर्मचारी संघटनेच्या आडून घाई गडबडीने बुद्धभूमीसाठी आवश्यक असलेली जमीन हाडपण्यास मदत करण्याचा प्रयत्न गोपनीय पद्धतीने सुरू केलेला आहे. त्यामुळे आज पंढरपूर नगरपरिषदेच्या समोर हलगीनाद आंदोलन व आमरण उपोषण करणार असल्याची माहिती सम्यक क्रांती संघटनेचे संस्थापक सिद्धार्थ जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पंढरपूर हे जागतिक कीर्तीचे पर्यटन स्थळ व्हावे, या नगरीचे सांस्कृतिक नगरीत रूपांतर करण्यासाठी प्रयत्न असला पाहिजे बुद्धभूमीच्या जागेवर बुद्ध विहार उभारण्यासाठी सनदशीर मार्गाने दिलेल्या प्रस्तावाची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी केली असतानाही सध्या मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना जागा देण्यासाठी प्रशासन प्रतिकूल असल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षापासून बुद्ध विहारचा प्रस्ताव स्थगित ठेवून अंतर्गत कुरघोडी सुरू असल्याचे दिसून येत असल्याने हे आंदोलन करण्यात येणार आहे.
उप अधिक्षक भूमी अभिलेख पंढरपूर, यांना जे बारा वर्षात जमले नाही ते बारा महिन्यात करून दाखविण्याची कर्तबगारी केलेली आहे. हीच सचोटी बुद्धभूमीसाठी आवश्यक असलेल्या जमिनीबाबत का दाखविली नाही याची चौकशी झालीच पाहिजे. तसेच पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, नगर अभियंता यांनी बुद्धभुमीच्या प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी अक्षम्य दुर्लक्ष केलेले असून ते बुद्धभुमीच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी शासनाच्या वैशिष्टयपूर्ण योजने अंतर्गत आणलेल्या निधीबाबतही उदासीनता दाखवत आहेत. याचा आम्ही तीव्र निषेध करीत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला. परंतु पंढरपुरातील तुळशीमाळ बनविणारे व तत्सम पूजा साहित्य बनविणाऱ्या स्थानिक उत्पादकांच्या व अनुसूचित जाती जमाती, नवबौद्ध तसेच भटक्या विमुक्त जातीतील लोकांच्या हितार्थ मागणी करूनही सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी पंढरपूर नगरपरिषद तथा महाराष्ट्र सरकारकडून अद्याप जागा मिळत नाही. परंतु विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या कर्मचारी संघटनेला तातडीने जागा देण्याचा खटाटोप सुरू आहे. हा खोडसाळ प्रकार त्वरित थांबवावा. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या कर्मचारी संघटनेला आवासासाठी जागा जरूर मिळावी. परंतु ती विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या ताब्यात असलेल्या जमिनीतून देण्यात यावी. वरील वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणाऱ्या जिल्हा भूमी अभिलेख अधिक्षक,उपअधीक्षक भूमी अभिलेख पंढरपूर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, नगर अभियंता यांचा आम्ही तीव्र निषेध करीत खालील मागण्या तातडीने मान्य कराव्यात असे सांगितले.
पंढरपूर नगरपरिषदेने लोकशाही मार्गाने प्रस्तावित केलेल्या यमाई तलावापैकीच्या जमिनीवरील बुद्धभूमीचा सनदशीर प्रस्ताव तयार करून घेऊन शासनाने त्वरित मंजुरी द्यावी.,पंढरपूर नगरपरिषदेने लोकशाही मार्गाने सनदशीर प्रस्तावित केलेल्या बुद्धभुमिसाठी आवश्यक असलेली यमाई तलावापैकीची जमीन संगनमताने घाई गडबडीने आणि खोडसाळपणे हाडपण्यास मदत करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्वरित कारवाई करावी. अन्यथा आम्ही आमच्या या न्याय्य मागण्यांसाठी पंढरपूर नगरपरिषद कार्यालया समोर आज गुरुवार दिनांक ०३/१०/२०२४ रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून हलगीनादासह आमरण उपोषण सुरू करीत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी सिद्धार्थ जाधव, प्रशांत लोंढे, स्वप्नील गायकवाड, रविंद्र शेवडे, कालिदास जाधव,दीपक वाघमारे,अक्षय सोनवणे, राजन गायकवाड ,विठ्ठल पवार,सनी पिंगळे उपस्थित होते.