
संपादक – दिनेश खंडेलवाल
कामिका एकादशी साठी पंढरीत दोन लाख भाविकांची मांदियाळी
दर्शन रांगेत होतेय महिला भाविकांची घुसखोरी
पंढरपूर(प्रतिनिधी):- आषाढी यात्रेनंतर येणारी एकादशी ही कामिका एकादशी म्हणून ओळखली जाते. ज्या वारकरी भाविकांना आषाढी देवशयनी एकादशीच्या सोहळ्यासाठी उपस्थित राहता येत नाही असे सर्व आषाढीची वारी पोहोचवण्यासाठी कामिका एकादशीला पंढरीत येतात आणि आपली वारी पोहोच करतात. पहाटेपासूनच विठ्ठल दर्शनाची रांग गोपाळपुर पर्यंत पोहोचली होती. कामिका एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरीत सुमारे दोन लाख भाविकांची मांडीयाळी असून मुखी हरिनाम, हाती टाळ, खांद्यावर पताका घेऊन वारकरी भक्तिमय वातावरणात आनंदात विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने दर्शनबारी मध्ये स्थिर झाले होते. दरम्यान दर्शन बारी मध्ये महिलांची घुसखोरी दिसून आल्याने भाविकातून संताप व्यक्त केला जात होता.
पंढरीत आलेला प्रत्येक वारकरी भाविक प्रथम चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाच्या दर्शनाला उभा राहतो मंदिरात आल्यानंतर
“झालें समाधान | तुमचे धरिले चरण || आतां उठावेंसें मना| येत नाहीं नारायणा ||”
या संत वचनाप्रमाणे त्यांच्या मुखातून विठ्ठला प्रति आदर भाव व्यक्त होतात.
प्रदक्षिणा मार्गावर तसेच वाळवंट आदी ठिकाणी वारकरी भाविकांची मोठी गर्दी होती. पंढरीत आलेला भावी नामदेव पायरीचे दर्शन घेऊन प्रदक्षिणेला लागतो परंतु खाजगी वाहनामुळे महाद्वार चौकात तसेच विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झालेली दिसून आली. यामुळे प्रदक्षिणा करणाऱ्यांना अडथळा निर्माण होत होता.
पत्राशेडमध्ये महिला वारकऱ्यांची घुसखोरी होताना दिसून येत होती. या ठिकाणी मंदिर समितीने ठेका दिलेल्या बीव्हीजी चे
कर्मचाऱ्यांसमोरच महिला भाविक दर्शन बारी मध्ये मधूनच घुसत असल्याची दिसून आले. मंदिर प्रशासनाने वारकरी भाविकांना कोणतीही सुविधा दिली नसल्याचे भाविकातून सांगण्यात येत होते. आषाढी यात्रेला मंदिर प्रशासनाबरोबर राज्य सरकारही आम्हा वारकरी भाविकांची सुविधेसाठी मोठा खर्च करते परंतु आज मोठ्या प्रमाणात भाविक पंढरीत दाखल असताना दर्शन बारी मध्ये कोणतीही सुविधा मिळत नसल्याने तीव्र समता व्यक्त केला जात असल्याचे दिसून येत होते.
दर्शनासाठी आज १२ ते १४ तासाचा कालावधी भाविकांना लागत होता. दरम्यान मधून घुसखोरी होत असल्याने दर्शन बारी अनेक वेळा थांबत असल्याचे भाविकांकडून सांगितले जात होते. प्रत्येक वारकरी भाविकांची एकच अपेक्षा होती दर्शन रांगेमध्ये यात्रे प्रमाणे सुविधा मिळाव्यात भाविकांना त्रास सहन करावा लागू नये अशी अपेक्षा काही वृद्ध वारकरी भाविकांनी बोलून दाखवली.