अनेकांना वाटलं माझी राख होईल पण प्रत्येकवेळी मी भरारी घेतली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लोकशाहीत पत्रकार आणि राज्यकर्ते हे शत्रू नसून हितचिंतक मुख्यमंत्री

संपादक – दिनेश खंडेलवाल
अनेकांना वाटलं माझी राख होईल पण प्रत्येकवेळी मी भरारी घेतली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लोकशाहीत पत्रकार आणि राज्यकर्ते हे शत्रू नसून हितचिंतक मुख्यमंत्री
मुंबई(प्रतिनिधी):- सध्याच्या राजकारणात संयम आणि सकारात्मकता या दोनच गोष्टी मला इथपर्यंत घेऊन आल्या. विरोधकांना जेव्हा वाटत होते की मी राजकारणात संपलो आहे. तेव्हा मी सकारात्मकतेने काम करत राहिलो. त्यातूनच मला पुन्हा संधी मिळाली आणि भरारी घेता आली असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठी पत्रकार संघातर्फे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांच्याहस्ते फिनिक्स पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फिनिक्स पुरस्काराविषयी बोलताना मिश्किल टिप्पणी केली. अनेकवेळा लोकांना वाटलं माझी राख होतेय आणि तेवढ्यात मी आपली भरारी घेतलेली असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
देशातील प्रमुख ११ नद्यांच्या पाण्यांनी भरलेल्या जलकुंभांचे श्री श्री रविशंकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते पूजन करून नदी व पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री फडणवीस पुढे म्हणाले की तुम्ही मला फिनिक्स पुरस्कार दिला म्हणजे मी काही राखेतून उभा राहिलेलो नाही. ही भरारी मी घेऊ शकलो कारण, मी कधी आव्हानांपासून पळालो नाही, आव्हानांना सामोरा गेलो, आव्हानांचा सकारात्मकतेने सामना केला. राख होण्याचा क्षण आला तेव्हा प्रत्येकवेळी सकारात्मकतेने पुढे गेलो. माणसांचा कधी द्वेष केला नाही, माणसं झुंजवली नाहीत किंवा टोकाचं राजकारण ही केलं नाही असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगले आहे हे बघण्याचा माझा सातत्याने प्रयत्न असतो. विरोधकांना जेव्हा वाटत होते की, मी राजकारणात संपलो आहे, तेव्हा मी सकारात्मकतेने काम करत राहिलो. त्यातूनच मला पुन्हा संधी मिळत राहीली आणि भरारी घेता आली.
पत्रकार आणि राज्यकर्ते हे एकमेकांचे शत्रू नसून लोकशाहीचे खरे हितचिंतक आहेत. समाजासमोर सत्याचे सर्व पैलू मांडणे हे पत्रकारांचे कर्तव्य आहे. तर पत्रकारांना योग्य पाठबळ देणे हे राज्यकर्त्यांचे पहिले कर्तव्य आहे. पत्रकारितेमुळे राज्यकर्त्यांना दिशादर्शन मिळते. म्हणूनच पत्रकारांना आधार देणे हे कोणत्याही सरकारचे प्राथमिक कर्तव्य आहे.
असा ठाम संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री श्री रविशंकर म्हणाले टीका आणि प्रशंसेचा समतोल साधणारा माणूसच जगाच्या कौतुकास पात्र ठरतो. देवेंद्र फडणवीस यांना हा पुरस्कार देऊन मराठी पत्रकार संघाने योग्य व्यक्तीची निवड केली आहे. परंतु पुढील वर्षी हा पुरस्कार देताना पत्रकार संघाचा कस लागणार आहे, कारण फडणवीस यांना सन्मान देऊन त्यांनीच एक उच्च मापदंड निर्माण केला आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी प्रास्ताविक करून पत्रकार संघाची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या विशेष व्हिडिओ बुकचे प्रकाशन झाले. विविध मान्यवरांचे मनोगतही व्हिडिओ संदेशाद्वारे प्रदर्शित करण्यात आले.
मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्रातील पदाधिकारी सदस्य व संघटक यांच्यासह पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप चव्हाण यांनी केले.