पंढरपूर-मंगळवेढ्याची जागा तुतारीकडेच राहणार?
कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे शरद पवार घेणार निर्णय...
संपादक – दिनेश खंडेलवाल
पंढरपूर-मंगळवेढ्याची जागा तुतारीकडेच राहणार?
कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे शरद पवार घेणार निर्णय…
पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघामधून भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना अनिल सावंत म्हणाले की पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ पारंपारिक पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे निश्चित या मतदार संघातून तुतारीचाच उमेदवार विजयी होईल. महाविकास आघाडीकडून एकच उमेदवार उभा राहील, इतरांना सांगण्या इतका मी मोठा नाही. महाविकास आघाडीचे सर्वोच्च नेते निश्चित योग्य तो निर्णय घेतील.
अनिल सावंत यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळाल्याने, पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल, याविषयी कार्यकर्त्यांमध्ये मोठी संभ्रमात होती. त्यातच काँग्रेसने शरद पवारांना विचारात न घेता या मतदार संघातून भगीरथ भालके यांना उमेदवार जाहीर केली.
या मतदार संघाची जागा यापूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे होती. त्यामुळे पारंपरिक या मतदार संघातून राष्ट्रवादी पक्ष निवडणूक लढवेल, असं चित्र होतं. मात्र अचानक काँग्रेसने आपला उमेदवार दिल्याने, या मतदार संघात आणखीन पेच निर्माण झाला. आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने अनिल सावंतांना मैदानात उतरल्याने काँग्रेसपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे.
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात तुतारीचा उमेदवार असायला हवा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मोठा आग्रह असल्याने, पंढरपूर मंगळवेढ्याची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडेच जाणार असल्याची दाट शक्यता आहे. अनिल सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अधिकृतरित्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून ए.बी. फॉर्म घेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
माढा लोकसभा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते अनिल सावंत यांना तुतारी चिन्हाचा ए.बी. फॉर्म देण्यात आला. अर्ज भरल्यानंतर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. पंढरपूर मंगळवेढ्याचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचाच होईल. असा विश्र्वास त्यांनी व्यक्त केला.
यवेळी पंढरपूर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष सुभाष भोसले, तालुकाध्यक्ष संदीप मांडवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुलजी शहा, मंगळवेढा शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, पंढरपूर मंगळवेढा कार्याध्यक्ष संतोष रंधवे,आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष महादेव पाटील, भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे संचालक पृथ्वीराज भैय्या सावंत, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा उपप्रमुख सुधीर भाऊ अभंगराव, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख महावीर नाना देशमुख, श्याम गोगाव, कृष्णदेव लोंढे, पंढरपूर शहर उपप्रमुख तानाजी मोरे, संदीप तापडिया आदी पदाधिकारी उपस्थित होते.