पंढरपूर मतदारसंघात दुसऱ्यांदा भाजपचे समाधान आवताडे विजयी
अस्तित्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या लढाईत समाधान आवताडे यांचा ८४३० मताधीक्यांनी विजय

संपादक – दिनेश खंडेलवाल
पंढरपूर मतदारसंघात दुसऱ्यांदा भाजपचे समाधान आवताडे विजयी
अस्तित्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या लढाईत समाधान आवताडे यांचा ८४३० मताधीक्यांनी विजय
• मतदारसंघातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी मतदारांनी दिली संधी – समाधान आवताडे
• शंका घेत दिलीप धोत्रे यांचा मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप
पंढरपूर(प्रतिनिधी):- २५२ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघावर पुन्हा एकदा भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी काँग्रेसचे प्रतिस्पर्धी उमेदवार भगीरथ भालके यांचा ८४३० मताधीक्यांनी पराभव केला आहे. समाधान अवताडे यांनी या मतदारसंघात दुसऱ्यांदा विजयी सलामी देत एकूण १,२५,१६३ इतकी मते मिळवली आहेत. मतमोजणी केंद्रा बाहेर अवताडे आणि परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत गुलालाची उधळण करत विजय साजरा केला.
मतदान केंद्राबाहेर विजयी उमेदवार समाधान दादा अवताडे आल्यानंतर म्हणाले की आज पंढरपूर मंगळवेढा मायबाप जनतेच्या खऱ्या अर्थाने भावना मतपेटीतून पाहायला मिळाल्या याचा अतिशय आनंद होतोय या मतदार संघाची सेवा करण्याची संधी मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून दुसऱ्यांदा दिली आहे. यासाठी मायबाप जनतेचे मनापासून आभार मानतो असे सांगितले. मतदारसंघातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा संधी दिली आहे.
माजी आमदार प्रशांत परिचारक यावेळी बोलताना म्हणाले की भाजपा महायुतीचे उमेदवार समाधान दादा अवताडे यांचा विजय या तालुक्यातल्या जनतेने केलेल्या कामाची पोचपावती आपल्या मताच्या रूपाने दिली आहे. या मतदारसंघातील मतदारांचे मी मनपूर्वक आभार मानतो या राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित दादा पवार यांनी गेल्या अडीच ते तीन वर्षात केलेल्या कामाची पावती म्हणजेच आजचा विजय आहे. असे ते म्हणाले.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघात एकूण
२४ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उभे होते. परंतु मतदार संघामध्ये चौरंगी लढतीचे चित्र दिसत असताना प्रत्यक्षात मात्र अखेरच्या टप्प्यात दुरंगी लढत होत असल्याचे दिसून आले. या मतदारसंघात भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे काँग्रेसचे उमेदवार भगीरथ दादा भालके, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अनिल सावंत व मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्यामध्ये चुरशीची लढत होईल असे चित्र दिसत होते. मात्र भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे आणि काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यातच दुरंगी चुरशीची लढत झाली. मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी सुरुवातीपासूनच आवताडे व भालके यांची मतांमध्ये आघाडी होत होती. त्यामुळे अटीतटीच्या वाटणाऱ्या या लढाईत अखेरच्या टप्प्यात आवताडे यांनी घेतलेली आघाडी ही विजय निश्चित करणारी ठरली.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघात एकूण ३,७३,६८४ मतदार संख्या होती. यापैकी २,६१,७२४ मतदारांनी मतदानात प्रत्यक्ष भाग घेत आपला हक्क बजावला होता. भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांना १,२५,१६३ तर काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांना १,१६,७३३ मते मिळाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांना १०,२१७ तर निवडणूक प्रचारात चांगली आघाडी घेतलेल्या मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांना २५६८ इतकी मते मिळाली आहेत. या निवडणुकीतील इतर उमेदवारांना २ हजार पेक्षा कमी मते मिळाली आहेत. यामध्ये विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
निवडणुकीची मतमोजणी संपताना काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांनी, मतमोजणी वर आक्षेप घेतला होता. परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा आक्षेप फेटाळून लावत, भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांना १,२५,१६३ मते मिळाली असल्याचे सांगत विजयी घोषित केले. समाधान अवताडे यांचा विजय झाल्याचे समजताच माजी आमदार प्रशांत परिचारक, युवक नेते उमेश परिचारक, प्रणव परिचारक यांच्यासह भाजपाचे उमेदवार आ. समाधान आवताडे यांनी मतमोजणी ठिकाणी दाखल झाले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी समाधान आवताडे यांना विजयी उमेदवार म्हणून प्रमाणपत्र बहाल केले. यानंतर समाधान आवताडे यांची जंगी मिरवणूक पंढरपूर शहरातून काढण्यात आली. याप्रसंगी अवताडे यांनी शहरातील महापुरुषांना अभिवादन केले. यानंतर शिवतीर्थावर जाहीर सभा घेऊन मतदारांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी मायबाप जनतेचे मतदारांचे आभार मानले. पोटनिवडणुकीत कमी कालावधीतही या मतदारसंघाचा विकास करण्याचा प्रयत्न केला होता परंतु आता पाच वर्षाच्या कालावधीत मतदारसंघाचा संपूर्ण विकास करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात प्रचारात मोठी आघाडी घेतली होती. प्रत्यक्ष निवडणूक निकाल हाती आल्यानंतर, त्यांनी मतमोजणी प्रक्रियेवर शंका घेत आपला आक्षेप पत्राद्वारे व्यक्त केला असून, हा तर शंभर टक्के ईव्हीएम घोटाळा असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. व्ही व्ही पॅटच्या स्लिपची मतमोजणी करण्याबाबत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांना पत्रही दिले आहे. ]