
संपादक – दिनेश खंडेलवाल
पंढरीत महत्त्वाच्या रस्त्यावर पावसाच्या पाण्याचे साठले तळे
वाहनधारकांची कसरत तर पादचारी नागरिकांतून होतोय संताप व्यक्त
पंढरपूर(प्रतिनिधी):- “झाडू संतांचे मार्ग करू पंढरीचा स्वर्ग” हे ब्रीदवाक्य घेतलेल्या पंढरपूर नगर परिषदेने नुकत्याच झालेल्या आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील महत्त्वाच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे तसेच काही ठिकाणी रस्त्यावर पॅच लावण्याचे टेंडर काढून कामे करून घेतली होती. परंतु ठेकेदाराने निष्क्रिय कामे केल्याची पोचपावती वरून राजाने दाखवून दिली आहे. यामुळे महत्त्वाच्या ठिकाणी पाणी साचल्याने वाहनधारकांना वाहन सावकाश खड्ड्येवाचवून आणि कसरतीने चालवावे लागत असताना दुसरीकडे मात्र पादचारी चालत असताना त्यांच्या अंगावर वाहनांमुळे साचलेले पाणी उडत असल्याने त्यांच्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर, मनोरंजन नगरीच्या समोरील रस्ता, नगर परिषदेकडे जाणारा रस्ता, नवी पेठ मधील काही भाग तसेच संभाजी चौक परिसरामध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने या ठिकाणी वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत असते. अनेक वेळा रस्त्यावरील खड्डे पाण्यामुळे दिसत नसून नेहमी वाहन चालवणाऱ्यांच्याही लक्षात येत नाही अशावेळी खड्ड्यात वाहनाचे चाक जाताच शेजारून चालणाऱ्या पादचार्यांच्या अंगावर ते पाणी उडते आणि वादविवादाचे प्रसंग घडतात. हा सर्व प्रकार म्हणजे ठेकेदाराकडून घाई गडबडीत आणि निकृष्ट दर्जाचे कामे झाल्यामुळे घडत आहे.
पंढरपूर तीर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. प्रदक्षणा मार्ग असो किंवा गजबजलेला चौक अथवा सतत रहदारी असणारा रस्ता असो, प्रत्येक ठिकाणी पावसाच्या पाण्याने पाणवठे निर्माण झाल्याचे दृश्य सध्या दिसत आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न शहरातील नागरिकांतून, वारकऱ्यातून, भाविकातून उपस्थित केला जात आहे.
पंढरपूर नगरपरिषदेने ज्या ठेकेदारांची बिले अजून अदा केली नसतील अशा ठेकेदारांकडून चांगल्या पद्धतीची क्वालिटीची व दर्जेदार कामे करून घेऊनच त्यांची बिले अदा करावी अशी मागणी ही नागरिकातून होताना दिसते. “पंढरीचा महिमा वर्णावा किती” असे संतांनी सांगितले आहे. परंतु “बा विठ्ठला, तुझ्या नगरीची दयनीय अवस्था पहावत नाही. अशा प्रकारची जाणीव करून दे रे बाबा अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक व जनतेतून व्यक्त होत आहे.