
संपादक – दिनेश खंडेलवाल
पंढरीच्या भू वैकुंठ स्मशानभूमीतून महीला मृतदेहाच्या राखेची चोरी
सोन्याच्या लालसेपोटी मृत्यूनंतरही मृतांना शांती नाही;नातेवाईकाकडून तीव्र संताप
पंढरपूर(प्रतिनिधी):- तीर्थक्षेत्र पंढरीच्या भू वैकुंठ स्मशानभूमी मधून महिला मृतदेहाच्या अग्निसंस्कारानंतर तिसऱ्या दिवशी राख सावडायला आल्यावर ज्या ठिकाणी महिला मृतदेहावर अग्निसंस्कार झाले होते त्या ठिकाणी राख व अस्थी नसल्याने मृत व्यक्तिच्या नातेवाईकासह आलेल्या नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला.
पंढरपूर शहरातील मयत व्यक्ती सौ. रतन चंद्रकांत जोजारे यांच्यावर अग्निसंस्कार झाल्यानंतर आज तिसऱ्याच्या विधीसाठी घरातील नातेवाईकांसह नागरिक भू वैकुंठ स्मशानभूमीत आल्यानंतर त्यांना मृतदेहाच्या अग्निसंस्कारानंतर राख व अस्थी रात्रीतून गायब झाल्याचे दिसून आले. दरम्यान सोन्याच्या लालसेपोटी मृत्यूनंतरही मृतांना शांती नाही. सोन्यासाठी काही टोळ्या गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सक्रिय असून महिला मृतदेहाची राख व अस्थी रात्रीतून गायब होण्याचे प्रकार अनेक वेळा घडले आहे. तिसऱ्याच्या विधीनंतर अस्थी पुढच्या विधीसाठी गोळा केले जातात परंतु अस्थी व राख काहीच नसल्याने याची प्रचिती आज पाहायला मिळाली. आलेल्या नागरिकांतून संताप व्यक्त होताना येथील प्रशासनावरही नाराजीचा सूर उमटताना दिसून येतो.
“इतकेच मला जाताना सरणावर कळले होते… मरणाने केली सुटका,जगण्याने छळले होते” या कवी सुरेश भटांच्या गझलेप्रमाणे धकाधकीच्या जीवनाला कंटाळलेल्या व्यक्तीला मृत्यूनंतर सुटका मिळते. परंतु पंढरपूर शहरात मात्र मृत्यूनंतर सरणावर जळालेल्या प्रेताच्या राखेतील सोने चोरून ‘मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारी’ टोळी पंढरीच्या भू वैकूंठ स्मशानभूमीत सक्रिय झाली आहे. या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाचे कोणतेही सोयरसुतक नसल्यानेच मृतांच्या नातेवाईकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
वैकुंठ स्मशानभूमीत सुवासिनी महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर सोन्याच्या लालसेपोटी चक्क तिची राख पळवण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे अनेक वेळा अंत्यसंस्कारानंतर तिसऱ्या दिवशी राख विसर्जनासाठी गेल्यानंतर तिथे राखच नसल्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना केवळ अंत्यसंस्कार केलेल्या जागेची पूजा करून घरी परतावे लागत आहे. हा प्रकार म्हणजे खऱ्या अर्थाने ‘मढ्यावरच्या टाळूवरचे लोणी खाण्या’ सारखाच आहे. या प्रकाराकडे गांभीर्याने पाहून पालिका आणि पोलीस प्रशासनाने संबंधित टोळ्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
प्रपंचाची ओढाताण, हयातभर सुख मिळवण्यासाठी धावणारे जीवन आणि शेवटी हाती शून्य… अशा अवस्थेत इहलोकीचा प्रवास संपविल्यानंतर अग्नीसंस्कार केलेल्या ठिकाणी प्रेताची रक्षा चाळून त्यामधून सोने शोधण्याचा अमानवीय प्रकार पंढरपूर शहरात वाढल्याने नातेवाईकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
स्मशानभूमीत सोन्याच्या लालसेने राख चोरून नेण्याच्या घटना वाढत असल्यामुळे पालिकेने या ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमण्याची गरज आहे. त्याचबरोबर, या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणेचीही तातडीने व्यवस्था करणे आवश्यक आहे. यासाठी पंढरपूरचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी महेश रोकडे यांना पंढरपूरचे माजी नगरसेवक विक्रम शिरसट, निलेश डोंबे, राजेंद्र राऊत यासह सामाजिक कार्यकर्ते काका बुरांडे, संजय ढाळे, मृतांचे नातेवाईक यांनी निवेदन दिले आहे. ]