
संपादक – दिनेश खंडेलवाल
पंढरीत सुगंधीत तंबाखु विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल
२ लाख २३ हजारांचा मुद्देमाल जप्त
पंढरपूर(प्रतिनिधी):- राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखूचा माल पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणात विकला जातो. तरुणांपासून वयस्कर पर्यंत क्रेझ असलेला मावा यापासून बनवण्यात येतो. या माव्यावर अनेक वेळा बंदी आणून सुद्धा पंढरपूरच्या काही भागात पिशवीतून पुड्या बांधून माव्याची विक्री सर्रासपणे होत आहे. कमी वयातच अनेकांना तोंडाचा कॅन्सर होऊ लागल्याने सरकारने यावर प्रतिबंध आणत सुगंधित तंबाखू व गुटखा यावर बंदी केली आहे अशा असतानाही पंढरपुरात अशा पदार्थांची विक्री होत असल्याने पोलीस प्रशासनाने अंकुश ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला. यामध्ये शहरातील एका घरातून सुमारे २ लाख २३ हजाराचा सुगंधित तंबाखू असलेला मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कर्नाटक राज्यातून शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात गुटका व सुगंधित तंबाखू येत असते यावर लक्ष ठेवून खबर्यामार्फत माहिती मिळाली की पंढरपूर शहरामध्ये सुगंधी तंबाखु अवैध रित्या विक्रीकरणार आहे. सध्या सदरची सुगंधीत तंबाखु ही पंढरपूर शहरातील वसीम निसार तांबोळी, रा. अकबर अली रोड, पंढरपूर यांचे घरी आहे. या माहितीच्या आधारावर वसीम तांबोळी यांचे राहते घरी पहाटेच पोलिस पथकाने जाऊन तपासणी केली असता सदर ठिकाणी सुगंधित तंबाखु असलेली तीन पांढऱ्या रंगाची पोती मिळून मिळून आली. सदर पोत्यामध्ये ५०० ग्रॅम वजनाचे सिलबंद सुगंधित तंबाखुचे पुडे असल्याचे निदर्शनास आले. सदर पाकिटे फोडून पाहिले असता त्यास सुगंधित तंबाखुचा वास येत असल्याचे आढळून आल्याने त्यांचेवर पंढरपूर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ५१०/२०२५ अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ चे कलम २६ (२) (i) (ii) (iv), २७ (३) (९),३० (२) (a), ५९ भारतीय न्याय संहिता कलम २२३,२७४,२७५, १२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर ठिकाणी कारवाईमध्ये मिळुन आलेल्या मालाचे वर्णन असे तिन पांढऱ्या रंगाची पोती त्यामध्ये प्रत्येकी ५०० ग्रॅम वजनाची २२३ पाकीटे प्रत्येकी १ हजार रू किंमतीची असे एकुण २ लाख २३ हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, सहा. पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ निलेश रोंगे, पोना विनोद शिंदे, पोकॉ राहुल लोंढे, शिवशंकर हुलजंती, मसपोफौ राजश्री कटके, मपोकों शोभा कदम यांनी केली आहे.
या कारवाईप्रमाणेच शहराच्या बाजारपेठ सह विविध भागांमध्ये पोलिसांनी पिशवीतून विक्री होणाऱ्या माव्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. तरच तरुणांच्या या व्यसनावर लगाम लागेल अशी प्रतिक्रिया जाणकारातून व्यक्त होत आहे.