
लोकपत्र न्यूज
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : कालवा मुरमीकरण करण्याच्या नावाखाली आणलेला मुरूम कालव्याच्या कडेला न टाकता संगनमताने चक्क शासकीय वाहणानेच चोरून विकला जात आहे. दिवसा ढवळ्या सुरू असलेल्या या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी भोसे येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की भोसे परिसरातील कालवा क्रमांक ३३ आणि ३४ मध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे टेल पर्यंत पाणी जात नव्हते तसेच कालव्याच्या साईड पट्टीची मोठी दुरवस्था झाल्यामुळे येथे राहणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाळ्यात तसेच इतर वेळीही मोठा त्रास सहन करावा लागत होता याबाबत वारंवार तक्रारी केल्यानंतर भीमा पाटबंधारे विभागाच्या वतीने भोसे परिसरातील या कालवा क्रमांक ३३ आणि ३४ च्या कालव्याचा भराव भरून घेण्याचे आणि कालव्यातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे.
सध्या भोसे परिसरातील हे काम जवळपास पूर्ण झालेले असताना करकंब पाटबंधारे विभागाच्या काही भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मनमानीपणे कालवा मुरमीकरणाच्या नावाखाली हा मुरूम काही हजार रुपयात विकण्याचा सपाटा लावला आहे. शेवते येथील कालवा क्र. ३४ च्या मायनर १ येथे कालव्याला मुरूम न टाकता MH. 14 CL 1525 या शासकीय टीप्परने रस्त्यापासून सुमारे ८० फूट अंतरावर एका शेतकर्याच्या दारात ४ खेपा टाकल्या याबाबत तेथील जागृत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला असता आम्हाला साहेबांनी मुरूम टाकायला सांगितले आहे असे सांगितले जात आहे.
याबाबत या शेतकऱ्यांनी भीमा पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय अधिकारी संभाजी गरड यांच्याशी संपर्क साधला असता मी कोणालाही कोणाच्या दारात मुरूम टाकायला संगितलेले नाही मात्र नक्की काय प्रकार झाला आहे याबाबत आमच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतो.
याबाबत भीमा कालवा मंडळाचे करकंब शाखा अभियंता रमेश साळुंखे यांनी सांगितले की शेवते येथील लक्ष्मण सुर्वे या शेतकऱ्याने आमच्या कर्मचाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरून स्वताच्या दारात मुरूम टाकून घेतला आहे. याबाबत अधिक कारवाई करण्यासाठी आम्ही करकब पोलिसात गुन्हा दाखल करत आहोत.
नियमानुसार ज्या कालव्यावर पाणी वापर संस्था कार्यरत आहे. त्याठिकाणी काम करता येत नाही तर सदर पाणी वापर संस्थांनी त्यांना मिळणाऱ्या अनुदानातून कालवा दुरुस्ती आणि भराव मुरमीकरण अशी कामे करणे अपेक्षित आहे. मात्र आम्ही माणुसकीच्या दृष्टीने हा मुरूम टाकत आहोत असे सांगत शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे.
अवघ्या काही दिवसात संपणारे काम अजून बाकी आहे असे सांगत जास्तीत जास्त दिवस वाढवत न्यायचे आणि जास्त बिले उचलायची अश्या पद्धतीने ही कामे सुरू आहेत. या कामात मोठा भ्रष्ट्राचार झाला असण्याची शक्यता असून याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची गरज परीसरातील शेतकरी व्यक्त करीत आहेत.
[ : पाटबंधारे विभागाचे कर्मचारी हे संगनमताने शासकीय मुरूम चोरून विकत आहेत. खूप दिवसांपासून हा प्रकार सुरू असून आज आम्ही त्यांना चोरून मुरूम विकताना रंगेहाथ पकडले आहे. यात खूप मोठा भ्रष्टाचार झालेला असून याबाबत चौकशी होणे गरजेचे आहे
– नारायण पवार, शेतकरी, शेवते]
बातमी व जाहिरात साठी संपर्क- दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com