
संपादक – दिनेश खंडेलवाल
पंढरीत लाखो भाविकांच्या श्रद्धेला तडा;पवित्र चंद्रभागा ड्रेनेजच्या सांडपाण्याने झाली मैली!
अन्यथा मैला मिश्रित चंद्रभागेचं पाणी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणीस, उपमुख्यमंत्री पवार, शिंदे यांना कमंडलू मध्ये पाठविणार – गणेश अंकुशराव
पंढरपूर(प्रतिनिधी):- “जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा” असे पवित्र चंद्रभागेच्या बाबतीत म्हटले जाते अनादी काळापासून भूतलावर अवतरीत असलेल्या पवित्र चंद्रभागेच्या पात्रात नदीच्या पैलतीरावरील ड्रेनेजचे सांडपाणी मोठ्या प्रमाणात मिसळत असल्याने पंढरीत आलेल्या लाखो वारकरी भाविकांच्या श्रद्धेला तडा जात आहे. चंद्रभागेच्या पात्रातील हेच पाणी तीर्थ म्हणून प्राशन करत असल्याने सर्वसामान्यांना आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असा प्रश्न उपस्थित करत महर्षी वाल्मीक संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी सदरचे मैला मिश्रित पाणी तीर्थ म्हणून देशाचे पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांना कमंडलु मधून पाठवणार असल्याचा इशारा दिला आहे.
लाखो साधुसंताच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चंद्रभागेच्या पाण्यामध्ये नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे ६५ एकर परिसरातील शौचालय व आजूबाजूच्या मठातील शौचालयातील सांडपाणी चेंबर मधून डायरेक्ट चंद्रभागेच्या पात्रात मिसळत आहे. त्यामुळे लाखो करोडो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या चंद्रभागेच्या पवित्र पाणी दूषित होत आहे.
लवकरात लवकर नगरपालिका प्रशासनाने याचे गांभीर्य ओळखून चंद्रभागेत मिसळणारे सांडपाणी बंद न केल्यास आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने चंद्रभागेचं पाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना व संबंधित मंत्र्यांना कमंडलूमध्ये पाणी पाठविणार असा इशारा महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने गणेश अंकुशराव यांनी दिला आहे.
हे मैला मिश्रित पाणी चंद्रभागेच्या पात्रात मिसळत असल्यामुळे अनेक भाविकांच्या भावना दुखावल्या जातात. हे घाण पाणी मिसळल्यामुळे चंद्रभागा पूर्ण दूषित झालेली आहे. हजारो भाविक भक्त चंद्रभागेच्या पाण्यात स्नान करतात तसेच पाणी तीर्थ म्हणून सेवन करतात. काही जण आपल्या घरी पूजन करण्यासाठी चंद्रभागेचे पाणी घेऊन जातात. जर असे मैला मिश्रित पाणी तीर्थ म्हणून सेवन केल्यामुळे भाविक भक्त आजारी पडतील. त्यामुळे याची दखल घेऊन चंद्रभागेमध्ये होत असलेलं मैला मिश्रित पाणी तात्काळ थांबवावे अन्यथा महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही यावेळी गणेश अंकुशराव यांनी दिला.