संतपेठ परिसरात धोकादायक उघड्या गटारी, घाणीचे साम्राज्य, दुर्गंधी कडे प्रशासनाचे दुर्लक्ष
न.पा. कोणाचा बळी जाण्याची वाट पहाते काय? नागरिकांतून संताप!

संपादक-दिनेश खंडेलवाल
संतपेठ परिसरात धोकादायक उघड्या गटारी, घाणीचे साम्राज्य, दुर्गंधी कडे प्रशासनाचे दुर्लक्ष
न.पा. कोणाचा बळी जाण्याची वाट पहाते काय? नागरिकांतून संताप!
पंढरपूर :- पंढरपूर शहरातील संतपेठ भागात शाळा नं. ७ च्या मागील परिसरात धोकादायक उघड्या गटारी, घाणीचे साम्राज्य, दुर्गंधीमुळे परिसरातील रहिवासी नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या ठिकाणी बंदिस्त गटारी करण्याबाबत पंढरपूर नगर परिषदेला जानेवारीमध्ये अर्ज देऊनही आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याने तेथील नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. मात्र पंढरपूर न.पा. प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करित असल्याने परिसरातील कोणाचा तरी बळी जाण्याची वाट प्रशासन पहाते काय? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
पंढरपूर न.प. प्रशासनाकडे गटारी बंदिस्त करण्याबाबत येथील नागरिकांनी वारंवार नगरपालिकेशी पत्रव्यवहार,अर्ज करुनसुद्धा नगरपालिकेने कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून संतपेठ शाळा नं. ७ मागील परिसरामधील रमाई नगर व गोपाळपूर रोड, शाळा नं. ७ ते पाण्याची टाकी अंतर्गत कोणतेही काम पूर्ण झाले नाही. तरी उघड्या गटारी असल्यामुळे जेष्ठ नागरिकांना, स्त्रियांना, लहान शाळकरी मुलांना अशा समस्येचा प्रचंड त्रास होत आहे. रात्री अपरात्री यामध्ये पडून मोठा अपघात होऊन जीवीत हानी होण्याचा धोकाही टाळता येऊ शकत नाही.
गेल्या काही वर्षांपासून या परिसरातील नागरिकांना मुलभूत सुविधा मिळत नाहीत. गटारांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. तसेच या गटारी उघड्या असून त्यामध्ये अतिशय घाण साचली आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव देखिल वाढला आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया चे डासांमुळे नागरिकांना या रोगांना बळी पडण्याची संख्या देखील या भागात वाढली आहे. तरी नगरपालिका कोणाचा तरी बळी गेल्यावर या गोष्टीवर लक्ष देणार का? अशी विचारणा या भागातील नागरिकांकडून होत आहे.
याच परिसरामध्ये देशाच्या सिमेवर सेवा करणारे नाईकनवरे यांचे देखिल निवासस्थान आहे. त्यांना देखिल या गोष्टीचा प्रचंड नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
पंढरपूर नगरपालिका प्रशासनाने या सर्व प्रकाराचा गांभीर्याने विचार करून या परिसरातील रहिवासी नागरिकांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी परिसरातील नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
[चौकट——………….
न.पा. अधिकाऱ्यांना समक्ष भेटून फोन वरुन संवाद साधून पण कोणतीच दखल घेतली जात नाही. यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दिनांक २४/०१/२०२४ व २६/०२/२०२४ असे दोन अर्ज देऊन सुद्धा प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. जर देशाची सेवा करणाऱ्या जवानांना न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील? याचा विचार नाही केलेलाच बरा अशी संतप्त प्रतिक्रिया दिपक नाईकनवरे यांनी व्यक्त केली.]