पंढरपूर तालुक्यातील आंबेचिंचोली येथे तालुका पोलिसांनी रोखला बालविवाह
वधू-वरा सह नातेवाईक व उपस्थित ५० ते ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : बदलत्या जीवनशैलीमध्ये जुन्या रूढी परंपरा आजही जपल्या जाताहेत बालविवाहाची प्रथा बंद करण्यात आली असतानाही राज्याच्या विविध भागात आजही बालविवाह होताना दिसून येतात. नुकताच पंढरपूर तालुक्यातील आंबेचिंचोली या गावांमध्ये तालुका पोलिसांनी बालविवाह रोखून वधू-वरा सह नातेवाईक आणि लग्नात उपस्थित असलेल्या सुमारे पन्नास ते साठ लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली अधिक माहिती अशी पंढरपुर तालुका पोलीस ठाणे हददीतील मौजे आंबेचिंचोली (तालुका पंढरपुर) गावातील गैबीपीर दर्गा समोर काल दुपारी १२:३० वाजणेचे सुमारास बालविवाह संपन्न झाले.
सदर घटनेची माहीती मिळालेने मौजे आंबेचिंचोली गावचे ग्रामविकास अधिकारी अनिल चिमराया पाटील आणि पंढरपुर तालुका पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार यांनी मौजे आंबेचिंचोली ता. पंढरपुर येथील गैबीपीर दर्गा समोर पथकासह जावुन खात्री केली असता तेथे यातील वधु ही १८ वर्षे वयापेक्षा कमी वयाची असलेचे निदर्शनास आले.
वधुचे वडीलांकडे मुलीच्या वयाबाबत चौकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देवु लागले. वधुचे जन्मातारखेचा दाखला प्राप्त करून खात्री केली तेव्हा वधुचे वय १७ वर्षे ०१ महिने ११ दिवस असल्याचे निदर्शनास आले. शासनाचे बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ चे कलम १० प्रमाणे यातील अल्पवयीन मुलीचे नातेवाईक तसेच नवरदेवाचे नातेवाईक, लग्न लावणारे काझी तसेच मंडपवाले व लग्नास उपस्थित असणारे सुमारे पन्नास ते साठ लोकांविरूध्द ग्रामविकास अधिकारी अनिल चिमराया पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंढरपुर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते मॅडम, अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम व पोलीस निरीक्षक मिलींद पाटील, पोसई / गोदे यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ / १५३८ सतिश गौतम चंदनशिवे हे करीत आहेत.
[पोलिसांचे नागरिकांना आवाहन—-
पंढरपुर तालुका पोलीस ठाणे हददीतील सर्व नागरीकांना पंढरपुर तालुका पोलीस ठाणेचे वतीने आवाहन करण्यात येते की आपले गावामध्ये होत असलेल्या बालविवाहाबाबत पोलीसांना माहीती देवुन बालविवाह रोखणेकरीता सहकार्य करावे]