
संपादक – दिनेश खंडेलवाल
आमदार अभिजीत पाटील यांनी केली पंढरपूर तालुक्यातील गावांची पूर परिस्थिती पाहणी
तहसीलदार सचिन लंगुटे यांच्या समवेत आमदार पाटील यांनी नदीकाठच्या गावचा केला पाहणी दौरा
पंढरपूर(प्रतिनिधी):- राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहू लागले होते. पंढरपूर तालुक्यात असलेले भीमा नदीचे पात्रही दुथडी भरून वाहत होते. तसेच चंद्रभागा नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नदीकाठच्या अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले आणि उभ्या पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी माढा मतदारसंघातील आमदार अभिजीत पाटील यांनी पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगुटे यांना सोबत घेऊन केली व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करण्याच्या सूचनाही दिल्या.
पंढरपूर तालुक्यातील अनेक गावे ही माढा मतदारसंघात येत असल्याने माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत आबा पाटील यांनी पूर परिस्थिती पाहणी दौरा केला. यावेळी पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली, वाडीकुरोली, शेळवे, खेडभाळवणी, कौठळी,व्होळे, खेडभोसे,देवडे, पटवर्धन कुरोली, आव्हे, पेहे, सांगवी, बादलकोट, उंबरे, करोळे,कान्हापुरी या गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या फळबागा, केळी, भाजीपाला, ऊस, पिकांचे नुकसानीची माहिती घेतली.
यावेळी पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगुटे हे उपस्थित होते. प्रत्येक गावातील नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्यात यावे अशा सूचना आमदार अभिजीत पाटील यांनी दिल्या. देवडे येथील पुराच्या पाण्यामुळे घर संसार उघड्यावर पडलेल्या नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंचे किट यावेळी देण्यात आले. यावेळी बोलताना आमदार अभिजीत पाटील म्हणाले की शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.