
संपादक – दिनेश खंडेलवाल
राज्य परिवहन महामंडळातर्फे सोलापूर जिल्ह्यात प्रवासी राजा दिननाचे उपक्रम
बुधवार ३ सप्टेंबर पंढरपूर
१० सप्टेंबर अकलूज तर १७ सप्टेंबर करमाळा येथे होणार
पंढरपूर(प्रतिनिधी):- राज्य परिवहन महामंडळातर्फे सोलापूर जिल्ह्यात प्रवासी राजा दिन या उपक्रमाचे नियोजन केले असल्याची माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना मिळणाऱ्या सेवा, सुविधांमधील अडचणी, समस्या,तक्रारी व सुचना ऐकून घेऊन जिल्हास्तरावरील अधिकारी व आगार प्रमुखांनी उपस्थित राहून तक्रारींचे निराकरण करावे व सेवेतील त्रुटी तातडीने दूर कराव्यात असे आदेश दिलेले आहेत. त्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात प्रत्येक आगारात एका बुधवारी प्रवासी राजा या उपक्रमाचे नियोजन केलेले आहे. पंढरपूर मध्ये बुधवार दिनांक ३ सप्टेंबर, अकलूज दिनांक १० सप्टेंबर तर करमाळा दिनांक १७ सप्टेंबर रोजी होणार आहे.
यावेळी जिल्हास्तरावरील एस टी चे अधिकारी व संबंधित आगार प्रमुख उपस्थित राहून अडचणीचे निराकरण करणार आहेत. तरी प्रवाशांनी,प्रवासी ग्राहक संघटनांनी आगारानिहाय बुधवारी दुपारी ११ ते १ यावेळेत संबंधित आगार प्रमुख कार्यालयामध्ये उपस्थित राहावे असे आवाहन महामंडळाचे सोलापूर विभाग नियंत्रक अमोल गोंजारी,अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांत सदस्य विनोद भरते, सुभाष सरदेशमुख, प्रांत सहसचिव दीपक इरकल,जिल्हा उपाध्यक्ष विनय उपाध्ये, सचिव सुहास निकते, कोषाध्यक्ष सौ. ललिता वांगडे जिल्हा महिला प्रमुख सौ. माधुरी परदेशी यांनी केले आहे.